पोंभूर्णा येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातील गैरव्यवहार उघड. #Pombhurna #fraud


केंद्रचालकावर गुन्हा दाखल.

चार दिवसाचा मिळाला पिसीआर.
पोंभूर्णा:- पोंभूर्ण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक केंद्र चालकानी बॅंकेतील जमा रक्कमेवर गैरव्यवहार करून डल्ला मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ग्राहकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रचालक नितिन जिवने याच्या विरोधात पोंभूर्णा पाेलिस ठाण्यात फसवणूक व गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाचा पिसीआर सुनावला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोंभूर्णा शहराची लोकसंख्या १० हजाराच्या आसपास आहे. गावात फक्त एक राष्ट्रीयीकृत बँक व एक मध्यवर्ती बँक असल्याने गावातील अनेक लोकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. यातुनच शहरातील नितीन राजभोज जीवने (वय ४२) यांनी पोंभूर्णा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे ग्राहक सेवा केंद्र सन २०१५ मध्ये सुरू केले. पोंभूर्णा शहर व तालुक्यातील इतर गावातील लोकांचा विश्वास संपादन करून ग्राहक सेवा केंद्रात आर्थिक व्यवहार सुरू केले. याचा फायदा घेत सन २०१५ ते २०२१ या कालावधीत ग्राहकांचे बनावट पासबूक, ठेव पावत्या तसेच बनावट खाते उघडून ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे जमा करून घेतले. सदरील पैसे संबंधित शाखेतील ग्राहकांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असताना केंद्र चालकांनी ग्राहकांनी जमा केलेली रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा न करता सदरील पैशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. ग्राहक सेवा केंद्र चालक यांनी संबंधित ग्राहकांची फसवणूक केली. याप्रकरणी घनोटी तुकूम येथील खातेदार मंगल सिताराम दुधबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन जीवने यांच्या विरोधात अपराध क्रमांक ११४/२०-२१ कलम ४०९, ४२० भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला चार दिवसाचा पिसिआर देण्यात आला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार करीत आहेत.
----------------------------------
ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फत अनेक खातेदारांच्या नावे असलेली रक्कम हडप केली असल्याची चर्चा असुन जवळपास ८०० च्या वर ग्राहकांची ७० लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
-------------------------------------
------------------------------------
ग्राहक केंद्रातील साहित्य केले जप्त.

ग्राहक केंद्राच्या चालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दादाजी ओल्लालवार व पोलिसांच्या पथकाने गुरूवारला ग्राहक सेवा केंद्रात जाऊन तेथील कागदपत्रे तसेच संगणक, प्रिंटर जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केले. संगणकामधील हार्ड डिस्क जप्त करून त्यातील डेटा तपासणी करण्यात येणार आहे.
------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने