24 तासांच्या आत दोन आरोपीना अटक
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- दि. 8 डिसेंबरचा सकाळी 6 वाजताच्या सुमारास शहरातील रमाबाई नगर परिसरात झरपट नदीच्या काठावर एका 35 वर्षीय महिलेचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत महिला रमाबाई नगर परिसरात राहणारी होती, मन्ना मनोज कोठार असे मृत महिलेचे नाव. रामनगर पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला असता महिलेची हत्या अवैध संबंधातून झाली असल्याचे निष्पन्न झाले.
रमाबाई नगर परिसरात राहणारे कंत्राटदार शशी कपूर चव्हाण यांच्यासोबत मागील 5 वर्षांपासून त्या महिलेचे संबंध होते, सदरील महिलेचा पती अवैध संबंधाला कंटाळून आपल्या गावी मुलाबाळांना घेऊन निघून गेला असल्याने मन्ना ही एकटीच राहत होती.
शशी कपूर व मन्ना आधी लपून छपून भेटायचे मात्र मन्ना च्या पतीने तिला सोडल्यावर शशी तिला राजरोसपणे भेटायचा, शशी ने तिला दुसऱ्या पत्नीचा दर्जा दिला होता.
वडिलांचे अवैध संबंध हे त्यांच्या मुलांना मान्य नव्हते, शशी यांचं कुटुंब बिहार राज्यात राहत होते, त्यांना 4 मुले असल्याने त्यांना मन्ना बाबत पूर्ण माहिती होती, या महिन्यात शशी यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा 20 वर्षीय अमरजित सिंग चव्हाण व त्याचा 14 वर्षीय चुलत भाऊ चंद्रपूरला आले होते. मन्ना चा काटा काढून आपल्या कुटुंबाला होणार बास कमी करू अशी भावना शशी यांच्या मुलांच्या मनात होती.
8 डिसेंबरला सकाळी 6 वाजता शौचास गेलेल्या मन्ना चा पाठलाग दोघा भावंडांनी केला व वाटेत तिला गाठत आमचे कुटुंब तझ्यामुळे विस्कळीत झाले असे म्हणत चाकूने मन्ना च्या मानेवर व पाठीवर सपासप वार केले. मन्ना मरण पावली असल्याचे समजताच दोघांनी तिथून पळ काढला.
रामनगर पोलिसांच्या सखोल तपासाने 24 तासांच्या आत आरोपीना अटक करण्यात आली, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.