चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक विद्यार्थी चंद्रपुरात येतो. चंद्रपूर समाचारसारख्या दैनिकात मिळेल ते काम करीत पत्रकारितेचे धडे घेतो. संपर्कात आलेल्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना अभ्यासतो, अनुकरण करतो, शिकतो, आत्मसात करतो, जे-जे नवीन शिकायला मिळेल, ते शिकण्याचा प्रयत्न करतो, केवळ प्रयत्नच नव्हे तर त्यात ‘बेस्ट’ द्यायचे या भावनेने काम करतो, बदलत्या काळानुसार नवे तंत्रज्ञान शिकत त्यातही नैपुण्य प्राप्त करतो. या सर्व बाबी बोलायला सोप्या वाटत असल्या तरी आत्मसात करायला तितक्याच कठीण आहेत. मात्र, ही जादुई किमया ज्यानं केली, त्याचं नाव आहे देवनाथ गंडाटे….
देवनाथ मुळातच महत्त्वकांक्षी…यश त्याच्या पायाशी लोळण घालत असलं तरी त्यानं त्याचा संयम सुटू दिला नाही. त्याच्यापेक्षा कोणी कितीही हुशार असला तरी त्यानं समोरच्या व्यक्तीचा अपमान कधी केला नाही. आपल्या क्षेत्रातील ज्येष्ठांचा मानसन्मान कायम ठेवत तो प्रत्येकाकडून प्रत्येकवेळी काही तरी नवं शिकत गेला आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांनाही करून देत गेला.
देवनाथचा पत्रकारितेतील प्रवास आश्चर्यचकित करणाराच आहे. तो एका ठिकाणी कधीच थांबला नाही. आज पत्रकारितेतील प्रत्येकाला त्यांच्या नोकरीची चिंता आहे. मात्र, देवनाथने नोकरीची चिंता कधीच केली नाही. जिथे चांगली संधी मिळाली, ती संधी त्याने स्वीकारली आणि त्या संधीचे सोने केले. देवनाथ मुळातच प्रयोगशील. चंद्रपूर समाचार, चंद्रपूर सकाळ, अलिबागचा कृषिवल, पुन्हा नागपूर सकाळ, नागपुरातच लोकशाही वार्ता असे अनेक टप्पे पार करीत असतानाच त्यानं इनडिझाईन सॉफ्टवेअर, कोरल ड्रा मध्ये निपुणता मिळविली. सोबतीला डिजीटल माध्यमात प्रवेश करण्याच्या दृष्टीने वेबसाईट मेकिंग, डिजीटल मार्केटिंगचेही धडे घेतले. स्वत: न्यूज पोर्टल तयार करण्याचं कसब त्यानं आत्मसात केलं. इतकंच नव्हे तर वेब पोर्टलचे पत्रकार अधिकृत पत्रकार आहेत, अधिकृत माध्यम म्हणून वेब पोर्टलला मान्यता मिळवून देण्यासाठी त्यानं चळवळ उभारली. त्याच्या ऑनलाईन कार्यशाळा तो घेऊ लागला. केंद्र शासनानं पोर्टलसंदर्भात नवी नियमावली तयार केल्यानंतर त्याचं शिक्षण तो या क्षेत्रातील संपादक, पत्रकारांना देऊ लागला. आज आय.टी.क्राफ्ट या एजंसीच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरपालिकेचं मॉडर्न कम्युनिकेशन हाताळण्याचं काम करतो आहे.
देवनाथचं भविष्य उज्ज्वल आहे. भविष्याची साद ऐकून त्यानं डिजीटल माध्यमात केलेलं पदार्पण त्याच्या भविष्यातील यशाची साक्ष देत आहे. जोडीला असलेला संयम, समजूतदारपणा, समर्पण आयुष्यात त्याला खूप मोठा करतील, हा विश्वास आहे. आज देवनाथचा वाढदिवस. यानिमित्ताने त्याला मनापासून माझ्यातर्फे आणि मित्र परिवारातर्फे शुभेच्छा…!
- आनंद आंबेकर