राज्यातील पदभरतीत वन विभाग अव्वल राहावा याकरता पदभरती प्रक्रिया तात्काळ राबवावी:- सुधीर मुनगंटीवार #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase


मुंबई:- राज्य शासनाने अमृतमहोत्सवी वर्षात सुरू केलेल्या पदभरती अभियानात वन विभाग अव्वल राहावा याकरता वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी असे निर्देश आज ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत.

मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत आज वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव, अपर मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, शोमिता विश्वास यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्य शासनाने या वर्षात 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वन विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरली जावीत, यादृष्टीने वन विभागाने आवश्यक कार्यवाही गतीने करण्याची गरज आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांच्या अनुषंगाने विभागाने तातडीने मागणी त्यांच्याकडे नोंदवून पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ज्या पदांची भरती टीसीएस या त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आहे, ती कार्यवाही विभागाने तात्काळ सुरु करावी. पदभरतीच्या प्रक्रियेत वन विभाग कुठेही मागे राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वन सांख्यिकी ही पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. त्याचबरोबर, लिपीक संवर्गातील पदांची भरती प्रक्रियाही आता लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाणार आहे. मात्र, इतर वर्ग-3 पदांच्या भरतीबाबत वन विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. पदभरतीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची तात्काळ सोडवणूक करुन वन विभाग या भऱतीप्रक्रियेत आघाडीवर राहील, यासाठी यंत्रणेने विहित वेळेत प्रक्रिया मार्गी लागेल, हे पाहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.