Top News

ना. जितेंद्र आव्हाड विरुद्ध भाजयुमोचे आंदोलन #Chandrapur

चंद्रपूर:- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाची (म्हाडा) नोकर भरती परीक्षा रद्द केल्याबद्दल भाजयुमोच्या वतीने गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोमवार, 13 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या नोकर भरतीसाठी 565 जागा निघाल्या होत्या. त्यासाठी 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता. 12, 15, 19 व 20 डिसेंबरला दोन सत्रामध्ये या परीक्षा घेण्याचे ठरले होते.
रविवार, 12 डिसेंबर 2021 ला सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक विधी सल्लागार व दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता यासाठी परीक्षा होणार होती. या दिवशीच्या परिक्षांसाठी 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. परिक्षेच्या आदल्या रात्री या विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आधीच हवालदील असलेले बेरोजगार विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या परिक्षेची वाट बघत असतात. परंतु, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांला परीक्षा देण्यापूर्वीच नैराश्य पत्करावे लागणे हे गृहनिर्माण विभागाचे मंत्री यांच्या निर्णयामुळे झाले. त्यामुळे या विरोधात माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. मुनगंटीवार आणि भाजपा महानगराचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोतर्फे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे भाजयुमोच्या एका शिष्टमंडळाने महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले. या विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजयुमो चंद्रपूर महानगरतर्फे करण्यात आली. यावेळी महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, भाजयुमो मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडावार, संजय पटले, यश बागडे, संयोजक सचिन यामावार, सतिश तायडे, राहूल पाल, क्रिष्णा चंदावार, मनिष पिपरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने