चंद्रपूर:- पुणे-मुंबईत सर्व संसाधने उपलब्ध असल्याने काम करणे तुलनेने बरेच सोपे आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात काम करणे नुसते आव्हान नाही तर तो सन्मान आहे असे सांगत गोंडवाना विद्यापीठ हे सर्वार्थाने लोकांचे विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी येथे बोलतांना दिली.
चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालीत पाच महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण व गौरव सोहळा मंगळवारी सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व. राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे या होत्या.
यावेळी बोलतांना डॉ. बोकारे पुढे म्हणाले की, शिक्षकांची भूमिका ही अतुलनीय आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचा आभाळभर आनंद शिक्षकांना होत असतो. देशाच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी सन्मानित होतांनाचा क्षण शिक्षकांसाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी बोलतांना डॉ. दिक्षीत यांनी आगामी काळात दरवर्षी सर्वोदय शिक्षण मंडळाचे वतीने एक उपक्रम राबविण्यात येणाचा मानस व्यक्त केला. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना सुधाताई पोटदुखे यांनी गुणवंत विद्यार्थी हे समाजात आदर्श निर्माण करतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख वाचत महाविद्यालयाला आय.ए.एस.ओ. दर्जा प्राप्त झाल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. प्रकाश शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. माहुरे, डॉ. पोतनुरवार यांनी केले. कोमल तिवाडे व समर्थ घरामी यांनी सर्वाधिक पूरस्कार प्राप्त केले.
सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित ५ महाविद्यालयातील एकुण गुणवत्ता प्राप्त ९४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिक्षांत सोहळयाच्या धर्तीवर हा गौरव सोहळा पार पडला. एन.सी.सी. बॅड पथकाच्या संचलनाने कुलगुरू डॉ. बोकारे यांच्यासह मान्यवरांना सभा स्थळाकडे नेण्यात आले.
माजी विद्यार्थी संघातर्फे एकुण २१ विद्यार्थ्यांना अभ्यासेत्तर २ उपक्रमात उत्कृष्ठ कामगीरी बद्दल गौरवान्वीत करण्यात आले.