चंद्रपूर:- राज्यातील गोरगरीब जनता लॉकडाऊन काळात उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवभोजन योजना सुरू केली होती. याद्वारे बचत गटाच्या महिलांना देखील रोजगार मिळेल असा उद्देश होता. मात्र, त्या उद्देशाला कुठंतरी तडा गेलाय असं दिसतंय. कारण, चंद्रपुरातील शिवभोजन थाळी चालवणाऱ्या बचत गटाच्या महिलांना चार महिन्यापासून अनुदान मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत.
शिवभोजन केंद्र निश्चितपणे बंद होतील. हे कोणी उद्योगपती चालवत नाहीतर बचत गटाच्या गरजू महिला चालवतात. चार महिने झाले त्यांचे पैसे दिले नाही. बील दिले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील शिवभोजन थाळी बंद झाली आहे. याचप्रमाणे राज्यातील थाळी देखील बंद होईल, असं मुनगंटीवार म्हणाले.
राज्य चालवायची इच्छा नसताना...
मुख्यमंत्र्यांना राज्य चालवायची कोणतीही इच्छा नसताना जबरदस्तीने शरद पवारांनी त्यांचा हात वर केला आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. त्या खुर्चीवर बसल्यानंतर ते आनंदी आहेत. ते स्वतः समाधानी आहेत. पण, राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात मुख्यमंत्र्यांना रुची नाही. ओबीसी आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण हे मुद्दे तसेच आहेत, असे आरोपही मुनगंटीवारांनी केले.
हे सरकारला शोभणारं नाही....
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देऊ असं सरकारने सांगितलं होतं. पण, ते अजूनही शेतकऱ्यांना दिलेलं नाही. निराधार योजनेचं अनुदान चार चार महिने दिलं जात नाही. आमच्या त्या विधवा आणि घटस्फोटीत महिला आहेत. त्यांना चार चार महिने अनुदान दिलं जात नाही. हे सरकारला शोभणारं नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.