शॉक लावून पट्टेदार वाघाची शिकार, मृत वाघाला पुरले जमिनीत #tiger #death #arrested

Bhairav Diwase
शिकार प्रकरणात चार आरोपींना अटक
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
चंद्रपूर:- शेतातील तारेच्या कुंपनाला वीज प्रवाहीत सक्रिय करून शाॅक लावून ठार झालेल्या पट्टेदार वाघाचा मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरूवारी (16 डिसेंबर) सावली वनपरिक्षेत्रातील पेंढरी मक्ता उपवनक्षेत्रात येथे उघडकीस आला. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेतीचा हंगाम सुरू असताना तीन-चार महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याने विद्युत प्रवाहीत कुंपण केले होते. दरम्यान त्या कुंपणाला सूरू असलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पट्टेदार ठार झाला. मृतवाघाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला.
सावली वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पेंढरी मक्ता येथे पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनविभागाने मिळाल्यानंतर वनविभागाने एका घरी धाड टाकली असता वाघाच्या मिशा आढळून आल्या. त्यामुळे चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये पांडुरंग मोनाजी गेडाम (वय-45), हिराचंद मुखरू भोयर (वय-35), रामदास बाजीराव शेरकी (वय-55), मारोती पोचु गेडाम (वय-36) सर्व रा. पेंढरी मक्ता यांचा समावेश आहे.
सदर चारही आरोपींना अटक केल्यानंतर वनकोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. बी. कामडी यांचेसह पेंढरीचे क्षेत्रसहाय्यक भोयर सावलीचे राजू कोडापे, पाथरीचे वासुदेव कोडापे, व्याहाड खुर्दचे सुर्यवंशी आणि वनरक्षक एस डब्ल्यू शेंडे, व्ही. जी. चौधरी, एस. चुधरी, सी.एम. गायकवाड, नागोसे, अहिरकर, आखाडे, आदे, आदी करीत आहेत.