Top News

वेळवा गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार #pombhurna

शेकडो महिला धडकल्या पोंभूर्णा पोलीस ठाण्यात

अनेक कुटुंबं उध्दवस्त; लहान मुलेही दारूच्या आहारी
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावात गेल्या सहा महिण्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. मद्यपींची इच्छा पुरविण्यासाठी दारू विक्रेते दारुची घरपोच सेवा देत आहे. वेळव्यातील दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी व दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी गावातील महीलांनी पुढाकार घेत शेकडोच्या संख्येने शुक्रवारी पोंभूर्णा पोलीस ठाण्यात येऊन धडकल्या. ठाणेदारांना संबंधित दारू विक्री व विक्रेत्यांच्या विरोधात तक्रारीचे निवेदन दिले आहे.
गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे. वेळवा गाव तालूक्यातील अवैध दारूचा मोठा अड्डा बनलेला आहे. सकाळपासूनच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी तळीरामांची रांग लागत असते, एवढेच नाही तर आष्टा, चेक आष्टा, सोनापुर, चेक फुटाणा, मोहाळा गावातील दारू शौकीन सुद्धा गावात दारू प्यायला येतात. सोबतच फोनवर सुद्धा सर्व वरील गावांना दारू पुरवठा केला जातो. एवढेच नव्हे तर दारू विक्रेत्यांनी आपल्याच घरी मिनी बार रूम सूरू केले आहे.मद्यपींना चकना, पाणी, ग्लास,दारू अशी विशिष्ट ट्रिटमेंट दिली जात आहे. गावातील गल्ली-मोहल्ल्यातील वातावरण दुषीत होत चालले असुन आया- बहीनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या आहारी आता शाळकरी मुलेही गेली आहेत.गावात एवढ्या खुले आम दारू कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा सवालही आता उपस्थित केल्या जात आहे.
गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामसंघाच्या वतीने गावातील संपुर्ण महिला बचत गटांचा ठराव घेऊन दि.१४ जानेवारीला गावातील शेकडोंच्या संख्येने पोंभूर्णा पोलिस ठाण्यात येऊन धडकल्या.आणि गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद झाली पाहिजे असा आवाज उठवला.याबाबत प्रभारी ठाणेदार निलकंठ कुकडे यांना लेखी तक्रारीचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना वेळवा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा जिजा लोणारे, शोभा उमक, संगिता संतोषवार, किरण लोणारे, वर्षा कुळमेथे, लता कावटवार, वैशाली कुळमेथे, किरण पडोळे, व्यंकटलक्ष्मी नुशेट्टी, सरस्वती जाधव यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने