Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आमदार फंडातील रस्त्याचे बांधकाम मोहबाळावासियांनी रोखले #bhadrawati

पाण्यासाठी सार्वजनिक बोरिंगचा वापर केल्याचा पत्रकार परिषदेत आरोप
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आमदार फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकाम रोखण्याची घटना भद्रावती तालुक्यातील मोहबाळा येथे नुकतीच घडली असून गावकऱ्यांनी रस्त्याच्या कामाबाबत कोणीही इस्टिमेट दाखवायला तयार नसल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला.
पत्रपरिषदेत तुलशीदास अशोक मिलमिले यांनी सांगितले की, मोहबाळा येथे आमदार फंडातून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले आहे. हा रस्ता भूमिपूजन प्रसंगी लावण्यात आलेल्या फलकावर कौशिक बिश्वास यांच्या किराणा दुकानापासून ते जि.प.शाळेपर्यंत दाखविण्यात आला असून ९५ मिटर अंतराचा आहे.
या रस्त्याचे बांधकाम नुकतेच सुरु करण्यात आले. या बांधकामाचे इस्टिमेट मागितले असता ग्राम पंचायत, सा.बां.अभियंता आणि कंत्राटदार यापैकी कोणीही दाखवायला तयार नाही.असाही आरोप तुलशीदास मिलमिले यांनी पत्रपरिषदेत केला. आम्ही गावातील नागरिक या नात्याने इस्टिमेट दाखवायला पाहिजे असेही ते म्हणाले. हा रस्ता पूर्वी डांबरीकरणाचा होता. या डांबरीकरणावरुनच सरळ काॅंक्रिटीकरण सुरु असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. या रस्त्यावर सिमेंट-काॅंक्रीटचे काम चालू असून त्यासाठी लागणारे पाणी सार्वजनिक बोरिंगमधून वापरले जाते. त्यासाठी सार्वजनिक बोरिंगवर मोटर लावून अवैधरित्या विद्युत वापरली जात आहे.असाही आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. कंत्राटदाराने पाण्याचे टँकर लावून बांधकामासाठी पाणी वापरावे. सार्वजनिक बोरिंगचा वापर करु नये अशीही मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली.
   दि. ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता सदर रस्त्याचे बांधकाम गावकऱ्यांनी बंद पाडले. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी हे बांधकाम सुरु करण्यात आले. यावेळी जोरजबरदस्तीने बांधकाम सुरु करुन तुमच्याने जे बनते ते करा अशी दमदाटीही कंत्राटदाराने केल्याचा आरोप तुलशीदास मिलमिले यांनी पत्रपरिषदेत केला. सूरज गावंडे हे या बांधकामाचे कंत्राटदार असून सिद्धांत पेटकर हे पेटी कंत्राटदार असल्याचे मिलमिले यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रकाश रामटेके, श्रावण वांढरे, सावकार साव, सूरज भुसारी, संघर्ष उके, सचिन उपरे, सचिन शेंडे, राजू पारखी उपस्थित होते. 
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे

ज्या रस्त्याचे बांधकाम काम चालू आहे, तो रस्ता नवीन नसून जुनाच आहे. त्याची केवळ दुरुस्ती सुरु आहे. ज्या बोरिंगचा पाण्यासाठी वापर करण्यात आला, ती बोरिंग आमदार निधीतून तयार करण्यात आली आहे. अजुनपर्यंत ती ग्राम पंचायतला सुपूर्द केलेली नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी आणि रस्त्याचे बांधकाम मजबूत करण्यासाठी त्या बोरिंगचे पाणी वापरण्यास काही हरकत नाही असे सर्व सदस्यांचे म्हणणे पडले म्हणून त्या बोरिंगच्या पाण्याचा वापर करण्यात आला.
सुनंदा वाघ सरपंच,
 ग्राम पंचायत, मोहबाळा
रस्त्याचे बांधकाम योग्य पद्धतीनेच

गावकऱ्यांनी पत्रपरिषदेत केलेल्या आरोपांसंदर्भात या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राटदार आणि काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष सूरज गावंडे यांनी सदर रस्त्याचे बांधकाम योग्य पद्धतीनेच असल्याचे सांगितले. सदर रस्त्याचे बांधकाम इस्टिमेटमध्ये तीन मीटरचेच आहे. परंतु लहान मुलांना अडचण होऊ नये म्हणून जवळपास शंभर महिला माझ्याकडे आल्या. त्यांनी रस्ता थोडा रुंद करा असे म्हटल्यामुळे मी तीन ऐवजी चार मीटरचा रस्ता करुन देत आहे. ब-याच दिवसांपासून सदर बोरिंगच्या पाण्याचा उपसा झाला नाही. असे एका ग्राम पंचायत सदस्यांने सांगितले. त्यामुळे खराब पाणी बाहेर फेकले जावे या चांगल्या हेतूने बोरिंगचा वापर करण्यात आला. 
सूरज गावंडे कंत्राटदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत