Top News

कु. शितल मेहता व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याकरिता सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र #chandrapur

चंद्रपूर:- दिनांक १६/०३/२०२२ रोजी कुमारी. शितल मेहता राहणार तुकुम वय २२ वर्षे हिचा पडोली पोलीस प्रशासनाने अपघाती मृत्यू झाल्याचे घोषित केले. परंतु तो अपघाती मृत्यू नसून बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला असल्याने सदर प्रकरणाची चौकशी ही सी.बी.आय. अथवा सी. आय. डी. कडून होऊन प्रकरणाची सत्यता समोर आणून गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून कु. शितल मेहता व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरिता आज दिनांक:- २३/०३/२०२२ ला सायंकाळी ५:०० वाजता श्री. अरविंद साळवे पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांना सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यां तर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळेस पीडितेचा भाऊ श्री. नितेश मेहता, कु. शुभांगी काकडे आणि उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी काही शंका जनक प्रश्न उपस्थित करून कु. शितल मेहता हिचा अपघात झाला नसून घातपात करून बहुदा तिचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला असल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.! असे ठणकावून सांगत सदर प्रकरणाची सत्यता समोर येण्याकरिता पोलीस अधीक्षकांना विविध यंत्रणा वापरून तथा वरिष्ठ तपास अधिकारी नेमून सदर प्रकरणाची विविध माध्यमातून चौकशी करण्याकरिता विनंती केली.
यावेळेस काही शंका जनक उपस्थित केलेले प्रश्न व केलेल्या मागण्या :-

१) मृत मुलीची मैत्रीण मुख्य साक्षीदार की सह आरोपी?

२) ज्याप्रकारे कु. शितल मेहता हिचा मोबाईल पोलिसांनी जप्त करून ठेवला त्याच प्रकारे मृतक मुलीचा प्रियकर अभिषेक देशभ्रतार व मैत्रीण कु. सोनाली चव्हाण व अक्षय चव्हाण तथा इतर घटनेत सामील असलेल्या संशयितांचा मोबाईल घटनेची सत्यता तपासण्या करितात का जप्त केला नाही.

३) मुलीच्या वाहनाला कुठलीही हानी नाही.

४) आरोपी मुलीचा प्रेमी अभिषेक देशभ्रतार मोकाट का?
५) मुलगी तिची दुचाकी (Deo) रस्त्या काठी ठेऊन प्रियकर अभिषेक देशभ्रतार याच्या बुलेट वर गेली होती मग अपघातात मुलगीच कशी मेली ? मुलाला अथवा त्याच्या दुचाकी बुलेटला काहीच नुकसान का झाले नाही.?

६) मुलगा सारखा मृत मुलीवर संशय करीत होता व त्रास देत होता अशी कबुली सोनाली चव्हाण हिने भ्रमणध्वनी वर चर्चा करीत असताना दिली आहे. तसेच मला सर्व माहीत आहे असे देखील कबुली तिने दिली आहे ... मग तिला अजून पर्यंत पोलीस प्रशासनाकडून विचारपूस का करण्यात आली नाही ?

७) पोलिसांकडून तपास काढून सी बी आय /सी. आय. डी. कडे द्यावा ही आमच्यासह पीडित परिवार व समस्त तुकूम वार्ड वासियांची मागणी.

८) तपासात हलगर्जी पना केल्यामुळे पडोली पोलीस निरीक्षकांनवर अद्याप निलंबनाची कार्यवाही का नाहीं.
९) अपघात नसून सुनियोजित कट व बलात्कार करून मारण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यास मुलीचे मरणानंतर चे खाजगी भागातील छायाचित्र हे पुरावे आहेत.

१०) शवविच्छेदन हे १२ तासाच्या आत करणे अत्यावश्यक असतानादेखील पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून शवविच्छेदनाला उशीर करण्यात का आला? तसेच तरुणीच्या प्रेमी वर बलात्काराचा संशय तरुणीच्या घरच्यांनी व्यक्त केला असताना देखील त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात का आली नाही? यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर पुरावा नष्ट केल्या अंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे.

११) सदर घटनेतील तरुण-तरुणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्यांचा बचावाकरीता पोलीस प्रशासन प्रकरणाची सत्यता उघडकीस न आणून प्रकरण दाबण्याचा तर प्रयत्न करीत नाहीं ना?
कारण अपघात झाल्याचा कुठलाही पुरावा नसताना देखील जाणीवपूर्वक अपघात झाल्याची तक्रार लिहिली. परंतु पंचनाम्या दरम्यान मुलीच्या खाजगी अंगातून रक्तवाहिनी होत असताना व घटनास्थळी चादर, बेडशीट, कंडोम चे पॉकेट आढळून आले असतांना देखील तक्रारीमध्ये बलात्काराचा उल्लेख कुठेही काबर करण्यात आलेला नाही?

१२) अभिषेक देशभ्रतार याची बुलेट गाडी पोलिसांनी जप्त का केली नाही ?

१३) कुमारी शितल मेहता हिला ज्या काळ्या रंगाच्या हुंदाई एसेंट गाडीमध्ये सोनाली चव्हाण चा भाऊ व अभिषेक देशभ्रतार हे विविध रुग्णालयांमध्ये घेऊन फिरत होते ती काळ्या रंगाची असेंट कार पोलिसांनी घटनेच्या तपासाकरिता जप्त का केली नाही?

१४) बुलेरो चालकाला अटक करण्याची घाई का करण्यात आली व अटक केल्यानंतर तात्काळ जामिनावर कसे काय सोडण्यात आले.

१५) शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच अपघात झाला असे निष्कर्ष लावून बुलेरो चालकाला अटक करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पडोली स्टेशन चे पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी कुणाच्या सांगण्यावरून केला आहे.

१६) कुमारी शितल मेहता चा मोबाईल कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता मोबाईल मधील व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, एस एम एस, ई-मेल, मेसेंजर यामधील आलेल्या - पाठविलेल्या सर्व एसएमएस कॉल्स ई-मेल डिलीट न करता तात्काळ पारिजानाच्या सुखरूप स्वाधीन करावा.
वरील एकंदर पडलेल्या प्रश्नांवरून कु. शितल मेहता हिचा अपघाती मृत्यू नसून बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस प्रशासनाने जनतेसमोर येऊन सदर प्रकरणाबाबत जनतेला पडलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर द्यावेत अशी विनंती देखील यावेळेस निवेदनामध्ये केली. व असा प्रकार परत कुणाशीही घडू नये याकरिता सदर प्रकरण दाबण्यात येऊ नये व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना परत असा गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळू नये याकरिता गुन्हेगारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे ज्यामुळे भविष्यात चंद्रपूर जिल्हासह संपूर्ण भारतामधील मुली खर्‍या अर्थाने सुरक्षित राहतील अशी विनंती यावेळी पोलीस अधीक्ष यांना करण्यात आली. 
यावेळेस उपस्थित पीडितेचा भाऊ श्री. नितेश मेहता, शेजारी कु. शुभांगी काकडे, श्री. सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर, श्री. सुरेश पचारे, नगरसेवक, शिवसेना चंद्रपूर, श्री. सुरज ठाकरे, जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात श्री. राहुल चव्हाण, श्री. ब्रिजभूषण पाझारे, भारतीय जनता पार्टी, श्री. रवी गुरनुले, माजी नगरसेवक भारतीय जनता पक्ष, सौ. प्रतिमाताई ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर, श्री. पुरुषोत्तम सहारे, सौ.मंजुश्री सुभाष कसंगगोट्टूवार, सौ. प्राध्यापक- प्रज्ञाताई बोरगमवार सौ. वनश्री मेश्राम, श्री. वैभव मेश्राम, वैभव येनपल्लीवर, प्रिन्स रामटेके, प्रियांशु सलामे, नयन मडावी आदी सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने