Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

संजय गजपुरे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जि.प.सदस्य पुरस्कार जाहीर #chandrapur

पुणे येथे ७ मार्च ला पुरस्कार वितरण सोहळा आयोजित

केंद्रिय पंचायत राज मंत्री ना. कपील पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्यात स्थापन झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन चा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार भाजपाचे जिल्हा संघटन महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांना जाहीर झाला आहे. येत्या ७ मार्च रोजी पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात भारत सरकारचे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या सदस्य पदाच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात विविध विषयांवर सभागृहात मांडणी केलेले प्रश्न , पाठपुरावा व त्याची उकल , केलेली विकासकामे , सामाजिक उपक्रमातील सहभाग या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेतांना ग्रामपंचायती बरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. या संस्थांचे काम अधिक लोकाभिमुख करण्याचे काम या संस्थांचे सदस्य करत असतात. या संस्थांमधील सरपंच, ग्रामसेवक तथा अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याच्या गौरव करणाऱ्या योजना राज्यात राबविल्या जात आहेत. परंतु जि.प. व पं.स. सदस्यांच्या विशेष कामगिरी व योगदानाची नोंद घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशातच दरवेळी बदलणारे गट व गण आणि आरक्षण यामुळे निवडणुकीपासुनही हे सदस्य वंचित राहतात.
या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य असोसिएशन , महाराष्ट्र च्या वतीने या लोकप्रतिनिधींच्या प्रभावी आणि दिशादर्शी कामगिरीची नोंद घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी असोसिएशन तर्फे ग्रामविकासाच्या संदर्भातील तज्ञ व राज्य प्रशिक्षक शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत राज्यातील अनेक तज्ञ मंडळींचा समावेश असुन प्राप्त प्रस्तावातील माहिती तपासुन ठरविलेल्या निकषांनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.
या पुरस्कार योजनेत जि.प.,पं.स.कामाचा अनुभव व ज्येष्ठता , विविध प्रशिक्षणातील सहभाग , मतदार संघात केलेले विकासकार्य , बैठकांमधील उपस्थिती , सभागृह कामकाजातील सहभाग व प्रभाव , त्रिस्तरीय पंचायत संस्थांच्या हितासाठी विभाग / राज्य पातळीवरील केलेले कार्य , मतदार संघात राबविलेल्या नाविण्यपूर्ण योजना /विशेष कामगिरी , कामाची वर्तमानपत्र व प्रसार माध्यमांनी घेतलेली नोंद , विविध विभागाच्या योजनांची अंमलबजावणी या निकष व मुद्द्यांवर १०० पैकी गुण देऊन राज्यातील जि.प.अध्यक्ष , सभापती व सदस्य तसेच पं.स.सभापती व सदस्य यांतुन सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधींना यापुढे दरवर्षी सन्मानित केल्या जाणार आहे.
राज्य असोसिएशन तर्फे अण्णासाहेब साठे सभागृह , येरवडा , पूणे येथे ७ मार्च ला होणाऱ्या या पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी संजय गजपुरे यांना पाठविलेल्या पत्रात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे कळविले आहे. नागभीड तालुक्यातील पारडी - मिंडाळा - बाळापुर गटातुन भाजपा कडुन विजयी झालेल्या संजय गजपुरे यांच्या सारख्या सक्षम , अभ्यासू व विकासाभिमुख जि.प.सदस्याला कार्यक्षम व उत्कृष्ट राज्यस्तरीय जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत