गडचिरोली:- पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने गोळी घालून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास धानोरा पोलीस ठाण्यात घडली. चंद्रभूषण जगत असे मृत जवानाचे नाव आहे.
धानोरा पोलीस ठाण्याच्या आवारात केंद्रीय राखीव दलाच्या ११३ क्रमांकाच्या बटालियनचा कॅम्प आहे. तेथे चंद्रभूषण जगत हा जवान कार्यरत होता. दरम्यान सकाळी साडेसात वाजता पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषणला कळली. त्यानंतर काहीही विचार न करता त्याने स्वतः वर बंदुकीची गोळी झाडली. लागलीच त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.
परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चंद्रभूषण जगत हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील कुकुर्दिकेरा येथील रहिवासी असून त्याची पत्नी गावी राहत होती. काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते आणि सुट्ट्या आटोपून तो काही दिवसापूर्वीच धानोरा येथे कर्तव्यावर रुजू झाला होता. अशी माहिती आहे. धानोरा पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.