राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून बांधला १२०० पोत्यांचा बंधारा #pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स च्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून अंधारी नदीच्या पात्रात १२०० पोत्यांचा बंधारा बांधला. पोंभुर्णा हा अतिदुर्गम आदिवासी व घनदाट जंगलांनी वेढलेला तालुका आहे. या भागात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असतो. मात्र, पाणी साठवणुकीची व्यवस्था नसल्याने पाणी वाहून जाते. परिणामी, उन्हाळ्यात स्थानिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या बंधाऱ्यांचा उपयोग शेतीसाठी, जनावरांना पाणी पिण्यासाठी, कपडे धुणे आदींसाठी व्हावा तसेच पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी बंधारा बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केला आहे. उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोट्या-मोठे बंधारे उपयुक्त ठरतील.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत चिंतामणी बहुद्देशिय शिक्षण मंडळ, बल्लारपूर व्दारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभुर्णा, आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्राम विकास व जलसंवर्धनाकरीता युवाशक्ती या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत आष्टा येथे दि. १९ ते २५ मार्च पर्यंत करण्यात आले होते.
गावकऱ्यांना उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गावच्या जवळील अंधारी नदीच्या पुलाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या सहकार्याने १२०० पोत्यांचा बंधारा बांधला. या बंधाऱ्याने नदीच्या पत्रात पाणी अडवले गेले असून या पाण्याचा उन्हाळ्यात वेळवा व आष्टा गावच्या नागरिकांना तसेच गुरांना देखील उपयोग होणार आहे. या कार्यासाठी स्वयंसेवकांनी प्रभातफेरी माध्यमातून गावकऱ्यांना प्रेरित केले.
यावेळी सरपंच किरण डाखरे, उपसरपंच रमेश कुंभरे, ग्रामसेवक मनोज मुडावार, माजी सरपंच हरीष ढवस, मुख्याध्यापक भोलेनाथ कोवे, गणेश दिवसे, किशोर डाकरे व ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी छत्रपती कस्तुरे, अदिप वनकर, रितीक गोनलवार, अभिलाष आकेमवार, भैरव दिवसे यांनी बंधारा बांधायला मदत केली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.
यशस्विततेसाठी प्रभारी प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संघपाल नारनवरे, प्रा. नितीन उपर्वट, प्रा. डॉक्टर. पूर्णिमा मेश्राम , प्रा. ओमप्रकाश सोनोने, प्रा. विजय बुधे तसेच आष्टा नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.