विवाह मंडप आकाशात उडाला #sky

Bhairav Diwase

पाहुण्यांची पळापळ; आनंदावर विरजण
यवतमाळ:- पाहुण्यांनी भरलेला विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाला. यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी एका विवाह सोहळ्याचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आलं होतं. भव्य विवाह मंडप पाहुण्यांनी गच्च भरला होता, लग्नाचे विधी करण्यास सुरुवात झाली आणि विवाह सुरु असतानाच अचानक वादळाने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला. यावेळी पाहुण्यांची तारांबळ उडून चिमुकली जखमी झाली आहे, तर एक-एक महिला आणि पुरुषही दुखापतग्रस्त झाले आहेत. मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली.
नेमकं काय घडलं?

विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाला. विवाह सुरु असतानाच अचानक वादळाने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला.
चिमुकली जखमी, महिला बेशुद्ध

यावेळी एकच हलकल्लोळ उडाला. वऱ्हाडाची पळापळ सुरु झाली. कुणी कुणाच्या अंगावर लाथा देत पळत होते. यात पाच वर्षांच्या चिमुकलीला इजा झाली, तर एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत. एक वऱ्हाडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
मंडपाचा काही भाग विद्युत तारेवर अडकला तर काही गावातील घरांवर जाऊन पडला. मंडपाला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून पडले. मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली.
उपाशीपोटी वऱ्हाडी परतले

यावेळचे हे चित्र अत्यंत भयावह होते. कुणी कुणाला तुडवत स्वतःचा जीव वाचवण्याची प्रयत्न करत होते. या विवाहाला जवळपास चारशेहून अधिक वऱ्हाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. पाहुण्यांसाठी तयार केलेले जेवण एकाच्याही पोटात गेले नाही. सर्वांना उपाशी पोटीच परतावे लागले.
हे वऱ्हाड आरंभी येथून भांब राजा येथे मोहन दगडू राठोड यांच्या मुलीच्या विवाहासाठी आले होते. मात्र अचानक आलेल्या वादळाने आनंदावर विरजण पडले. जिथे तिथे या घटनेची चर्चा सुरु आहे.