Top News

ट्रॅक्टर सुरू ठेवून चालक नाचायला गेला अन् घात झाला #accident

सावली:- खुपदा आपण वाहन सुरू ठेवून काहीतरी लगेच घ्यायला पळत सुटतो. पण अस करणं घातक ठरू शकते, अशीच एक घटना सावली तालुक्यात घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोथली येथे निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टर सुरू करून चालक नाचायला गेला. यात ट्रॅक्टर अचानक समोर गेल्याने चारजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बोथली येथे घडली.
कोरोना प्रतिबंधामुळे दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत नव्हता. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय उत्साहात प्रत्येक गावात मिरवणूक काढण्यात आली. सावली तालुक्यातील बोथली येथे उत्साहात काढलेल्या मिरवणुकीत हा अनपेक्षित अपघात घडला. बाबासाहेबांचा रथ असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकालाही मिरवणुकीत नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने ट्रॅक्टर बंद न करता ताे चालूच ठेवून नाचण्यासाठी खाली उतरला.
दरम्यान, ट्रॅक्टर पुढे असणाऱ्या लोकांच्या अंगावर गेल्याने त्यात चारजण जखमी झाले. प्रतीक भारत दुर्गे (वय २२), उषा उमाजी कोसनकर (४५), योगिता सागर खोब्रागडे (३१, सर्व रा. बोथली) व शालिनी दुर्योधन कुमरे (३५, रा. हिरापूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार रामकृष्ण बोधे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने