Top News

आकाशातून पडलेल्या वस्तूंचे अवशेष सापडण्याची मालिका अजूनही सुरूच #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रह्मपुरी:- आकाशातून पडलेल्या वस्तूंचे अवशेष सापडण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. जंगलात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेलेल्या एका युवकाला मंगळवारी बोदरा, एकरा जंगलात आकाशातून खाली कोसळलेल्या उपग्रह प्रक्षेपकाचे अवशेष आढळून आले.
या घटनेची माहिती युवकाने पोलिस पाटलास दिली. त्यानंतर पोलिस पाटलाने पोलिस प्रशासनाला याची माहिती दिली. पोलिस प्रशासनाने हे अवशेष ताब्यात घेतले आहे. याआधी सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी, पवनपार, मरेगाव, आसोलामेंढा येथे व वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात अवशेष सापडले होते. आतापर्यंत एक लोखंडी रिंग, चार लोखंडी गोळे सापडलेत. मंगळवारी पुन्हा ब्रम्हपुरी तालुक्यात पाचवा लोखंडी गोळा सापडला आहे.
ब्रह्मपुरीपासून जवळपास ४० किमी अंतरावर असलेल्या एकारा-बोदरा जंगल परिसर आहे. याच भागात एक युवक शेळ्या चारण्यासाठी गेला होता. त्याला जंगलातच लोखंडी गोळा सापडला. त्याने याची माहिती गावचे पोलिस पाटील गुरुदास संग्रामे यांना दिली. त्यांनी जंगलात जाऊन हा लोखंडी गोळा आपल्या ताब्यात घेत घरी आणून ठेवला. त्यानंतर याची माहिती मेंडकी पोलीसांना कळवली. मेंडकी पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कावळे, पोलिस अंमलदार खुशाल उराडे यांनी घटनास्थळ गाठत हा लोखंडी गोळा आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर तो ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. इतर ठिकाणी अशा आणखी वस्तू आढळल्यास नागरिकांनी सदर वस्तुला स्पर्श करू नये तसेच सेल्फी घेण्याचे टाळावे. याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
शोधानंतरच वस्तुस्थिती कळेल:- पालकमंत्री

जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या तप्त वस्तू नक्की कशाच्या आहेत व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल. त्यासाठी प्रशासनाने इसरो आणि डीआडीओशी संपर्क करून माहिती दिली आहे. या खगोलशास्त्रीय वस्तूंची पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम येण्याची शक्यता आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
इस्रोशी प्रशासनाचा संपर्क

शनिवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून लाल रंगाची वस्तू जमिनीवर पडताना दिसली. जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात गोलाकार रिंग आणि लोखंडी गोळे आढळले असले तरी या घटनेबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने