Top News

"त्या" तरुणीच्या मारेकऱ्यांला शोधण्यासाठी २०० पोलिसांचा फौजफाटा #chandrapur


चंद्रपूर:- निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचे शिरावेगळे धड आढळलेल्या घटनेला ३-४ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागले नाहीत. अद्याप ना तरुणीची ओळख पटली आहे, ना मारेकऱ्यांचा शोध लागलेला आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या घटनेची पार्श्वभूमी पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे २०० पोलीस या तपासात गुंतले आहेत. तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.
नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भद्रावती येथे सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तपासाला गती देण्यासाठी काही दिशानिर्देश दिले. त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. तरुणीचे शीर धडावेगळे करुन देखिल घटनास्थळी रक्त आढळले नाही. यावरुन इतरत्र हत्या करून धड भद्रावती येथे आयटीआय समोरील शेतात आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अतिशय क्रूर पद्धतीने खून केल्याची घटना सोमवारी (दि.४ एप्रिल) भद्रावती येथे उघडकीस आली होती. सुमारे २५ वर्षीय वयाच्या तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत धडापासून शिर वेगळे केलेला मृतदेह आढळून आला होता. परंतु, शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. पोलिसांनी सर्व बाजूने तपासाला गती दिलेली आहे. सुमारे २०० पोलीस अधिकारी व पोलीस या तपासात गुंतले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने