Click Here...👇👇👇

हेटी नांदगाव येथे महिलांना होणाऱ्या त्रासाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली दखल #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हेटी नांदगाव येथील भीषण पाणी समस्येचे वास्तव प्रशासनाच्या नजरेस आणुन देताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत प्रशासनाच्या स्थानिक अधिकारी यांना तत्काळ समस्या सोडविण्याचे आदेश दिले. त्यानुसार 50000 लिटर पाण्याची टाकी बसविण्यात येणार असून, नविन पाईपलाईन व पंप तसेच जलशुध्दीकरण मशीन लावण्यात येणार आहे.
गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव गावात पाणी नसल्याने विवाह थांबले आहेत. या गावातील पाणी समस्या सोडविण्याची मागणी शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांच्या मार्गदर्शनात महिला जिल्हा संघटिका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांनी प्रशासनाकडे केली होती.
गावापर्यंत आलेली जलवाहिनी फुटलेली आहे व अनेक भागांमध्ये नळच येत नाही. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. महिलांचा संपूर्ण दिवस पाणी गोळा करण्यात जातोय. त्यामुळे कोणीही इथल्या तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा कानाडोळा केला जातो.
टाकीत जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्यामुळे गढूळ पाणी येते. त्यामुळे गावातील लोकांना फिल्टर तसेच पाणी शुद्धीकरण मशीन बसवून जर पाणी स्वच्छ शुद्ध करून दिले असते तर लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळु शकते आणि पाण्याची समस्या मिटू शकते. पाणीटंचाई सोबतच या गावामध्ये सध्या अनेक सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत.
पाणीच नसल्यामुळे या गावातल्या मुलांची लग्न सध्या जुळत नाही. या समस्येबाबत पाठपुरावा सातत्याने इथले गावकरी करतात. मात्र, पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा या गावकऱ्यांना मिळु शकला नाही. याची माहिती मिळताच चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांनी हेटी नांदगाव येथे जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना आपण पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला आघाडीच्या वतीने पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
प्रशासनाने येथील गावक-यांच्या समस्यांची दखल घेत हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी प्रा. शिल्पा बोडखे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, महिला जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांनी केली होती. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत उपाययोजना करण्यास सांगितले. त्यानुसार 50000 लिटर पाण्याची टाकी बसविण्यात येणार असून, नविन पाईपलाईन व पंप तसेच जलशुध्दीकरण मशीन लावण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने गावातील महिलांची होणारी पायपीट आता थांबणार आहे.