विदेशातील कोळसा वापराबाबत शासनाने पुनर्विचार करावा:- डॉ. अंकुश आगलावे #chandrapur


भद्रावती:- विदेशातील कोळसा वापराबाबत शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून वीज निर्मितीकरीता विदेशातून कोळसा आयात करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे.
महाराष्ट्र सरकारने इंडोनेशियातून कोळसा आयात करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेच्या वीज बिलामध्ये वाढ होणार असून नाहक जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सततची महागाई, पेट्रोल, डिझेलचे दर आधिच गगनाला भिडले असून यात जादा वीज बिलाची भर जनतेला वेदनादायी ठरणार आहे.
               महाराष्ट्र राज्यातील विदर्भात अनेक ठिकाणी कोळसा खाणी आहेत. त्यात माजरी, नागलोन, युजी टू ओसी प्रकल्प, बल्लारपूर क्षेत्र, धोपटाळा प्रकल्प असा विकल्प शासनाकडे आहे. भारतात कोळशाचे उत्पादन मुबलक प्रमाणात असून विदेशातून जादा दराने आयात करण्याऐवजी भारतातील उत्पादीत कोळशाचा वापर केला तर सोयीचे ठरत असल्याचे डॉ. आगलावे यांनी निवेदनात नमुद केले आहे.
               डॉ. आगलावे यांनी महाजनको, उर्जामंत्री महाराष्ट्र शासन यांनासुद्धा विदेशातून होणा-या कोळशाच्या आयातीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. सामान्य जनतेला भविष्यात येणा-या जादा वीज बिलाच्या संकटातून सुटका करावी अशी विनंती निवेदनातून डाॅ. आगलावे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत