चंद्रपुरातील दारू दुकानांचे स्थानांतरण, मंजुरी वादग्रस्त #chandrapurचंद्रपूर:- धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था व रुग्णालयाजवळ निवासी वस्तीत देशी दारू दुकानाचे स्थालांतरण, बीअर शॉपी व वाईन शॉपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिल्याने संबंधित परिसरातील नागरिकांत रोष उफाळून येऊ लागला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजूर केलेले सर्वच परवाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
चंद्रपुरातील जगन्नाथ बाबा नगरात परवानगी दिलेले देशी दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी डोळेझाक करून दुकानदाराच्या बाजूने अहवाल सादर केला आणि जिल्हा प्रशासनाने स्थानांतरण व दुकान वाटपाला मंजुरी दिली, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मनपाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचा दाखला घेणे आवश्यक आहे. परंतु, सर्वच प्रकरणात असा दाखला घेण्याचे टाळण्यात आले, असेही परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात नागरिकांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्पादन शुल्क विभागावर टीका केली.
दाताळा मार्गावरील देशी दारू दुकानाच्या उत्तरेकडून रस्ता असल्याचे अहवालात दाखविले; पण दुकानाच्या उत्तर व दक्षिणेकडे खासगी प्लॉट आहेत. हाकेच्या अंतरावरील जगन्नाथबाबा मठ, चर्च, बालाजी व हनुमान मंदिर असूनही अहवालात माहिती नाही. नागपूर रोडवरील महालक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित देशी दारू दुकानाला लागून बाल रुग्णालय, दत्त मंदिर, प्राथमिक शाळाही अहवालात नाही.
केडी कॉम्प्लेक्सच्या मंजूर नकाशात उत्तर-दक्षिण दोन्हीकडे प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारापासून डॉ. कोलते यांच्या दवाखान्यामागे नागदेवता मंदिर आहे. मंदिरामुळे अडचण निर्माण होऊ नये, यासाठी दक्षिणेकडील मंजूर नकाशातील प्रवेशद्वार बंद करण्याचा सल्ला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू दुकानदाराला दिल्याचा आरोप आहे.
सराफा बाजारात जैन मंदिराजवळ काळे यांचे फटाक्यांचे दुकान होते. या दुकानात आता बीअर शॉपी व वाईन शॉप सुरू होणार असल्याने जैन मंदिरात येणारे भाविक व सराफा व्यावसायिक संतापले आहेत.
नियम डावलून वाटप केलेल्या दारू दुकानांविरोधात बुधवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. मंगळवारी जगन्नाथ बाबा नगरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देऊन तेथील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस व महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळ, शाळा व रुग्णालयाजवळ दारू दुकानांना परवानगी दिली. अशा अधिकऱ्यांची सरकारकडे तक्रार करून निलंबनाची मागणी करणार आहे.
-पप्पू देशमुख,
अध्यक्ष, जनविकास सेना, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत