Top News

सहा हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठ्यास अटक #arrested

गडचिरोली:- शेतजमिनीचे फेरफार करण्याच्या कामाकरीता तक्रारदाराकडून ६ हजारांची लाच स्वीकारताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आरमोरी तालुक्यातील इंजेवारी तलाठी कार्यालयातील महिला तलाठय़ास रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई २१ जून रोजी करण्यात आली. रोहिणी श्रीहरी कांबळे (३७) असे लाच स्वीकारणार्‍या महिला तलालाठय़ाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार याला आरमोरी तालुक्यातील साजा क्र. १८ इंजेवारी तलाठी कार्यालयातून वडिलोपार्जित भाऊ हिस्सा सोड शेतजमिनीचे फेरफार करावयाचे होते. मात्र येथील महिला तलाठी रोहिणी कांबळे यांनी या कामाकरीता तक्रारदाराकडून ७ हजार ५00 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ६ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार केली. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याची खात्री करुन आज २१ जून इंजेवारी तलाठी कार्यालयात सापळा रचला.
यावेळी तलाठी रोहिणी कांबळे यांना त्यांच्याच कक्षात तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचखोर महिला तलाठय़ावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थू धोटे, पोना राजेश पद्मगिरवार, स्वप्नील बांबोळे, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे व पथकाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने