Top News

क्रांतीज्योती महिला बचत गटाच्या उत्पादनाची संपूर्ण भारतात चर्चा झाली पाहिजे:- मकरंद अनासपुरे #chandrapur #bhadrawati


उल्का प्रकल्पाचे थाटात लोकार्पण
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- क्रांतीज्योती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या 'उल्का' या वनउपज प्रक्रिया उद्योग केंद्राच्या उत्पादनाची संपूर्ण भारतात चर्चा झाली पाहिजे यासाठी दररोज प्रयत्न करा व आपल्या उद्योगाचे नाव मोठे करा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त मकरंद अनासपुरे यांनी भद्रावती तालुक्यातील वडाळा(तु.) येथे केले.


ते वडाळा येथील क्रांतीज्योती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या 'उल्का' या प्रक्रिया उद्योग केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हा छोटासा लोकार्पण सोहळा जरी असला तरी ही घटना महत्त्वाची आहे. आज या घटनेचे मोल किती आहे, हे मला माहीत नाही. पण वीस वर्षांनंतर येथे मोठे काहीतरी घडले असेल, महिलांचा राबता असेल, अनेक महिला रोजगाराला लागल्या असतील त्यादिवशी तो आपला सुदिन असेल असेही अनासपुरे म्हणाले. आमदार प्रतिभाताईंनी या महिलांच्या उत्पादनाकरिता प्रदर्शनीचे आयोजन करावे असे आवाहनही अनासपुरे यांनी आ.प्रतिभाताई धानोरकर यांना केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर सदाशिवन होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खा.बाळूभाऊ धानोरकर, आ. प्रतिभाताई धानोरकर, पर्यावरण मित्र विजय देठे, पूर्वा जोशी, डॉ.इंद्रजित देशमुख, संजय नाईक, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर, हरीश इथापे, गणेश थोरात प्रभृती मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व फीत कापून उद्योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे वृक्षरोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मकरंद अनासपुरे यांचा बायोकान्सेप्ट पुणे च्या पूर्वा जोशी, पर्यावरण मित्र चे विजय देठे आणि त्यांचे सहकारी व क्रांतीज्योती महिला बचत गटातर्फे मिलिंद बोकील लिखीत 'पाच गावची कहाणी' हे पुस्तक, शाल, श्रीफळ, वटवृक्ष रोपटे आणि कमळफूल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या उद्योग केंद्रासाठी जमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुभाष कुळमेथे यांचा मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी खा.बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणातून हा प्रकल्प चालू केल्याबद्दल आनंद व्यक्त करत सी. एस. आर. फंडातून हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तर आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी या प्रकल्पाला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी क्रांतीज्योती महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता भरडे व सदस्या विमादेवी गजबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
*सुधीर मुडेवार यांचाही झाला सत्कार*
सन २०१६ मध्ये 'नाम' या संस्थेच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात म्हणून चंदनखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार यांनी आपल्या मुलाचा बारशाचा कार्यक्रम रद्द करुन 'नाम' संस्थेला पन्नास हजार रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल सुधीर मुडेवार यांचाही यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्वा जोशी यांनी केले. संचालन शंकर भरडे यांनी केले. तर आभार माधव जीवतोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रांतीज्योती महिला बचत गटाच्या सदस्यांनी आणि इतरांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने