Top News

खासदार बाळू धानोरकर यांनी रोखली जड वाहतूक #chandrapur #warora

एकोणा खाणीतील कोळशाच्या जड वाहतुकीने नागरिक होते त्रस्त

वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी घेतला जड वाहतूक बंदीचा निर्णय
चंद्रपूर:- वेकोलिच्या एकोणा येथील खाणीतून कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणास सुरू होती. दिवस-रात्र धावणाऱ्या वाहनांचा आवाज आणि धुळीच्या प्रदूषणामुळे वरोरा, माढेळी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार धानोरकरांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, कारवाई झाली नाही. अखेर, शनिवारी २५ जूनला खासदार धानोरकर यांनी स्वता जड वाहतूक रोखून धरली. ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी कोळशाची जड वाहतूक बंद करण्याचे आदेश काढले आहेत.
वरोरा ते माढेळी मार्गाने एकोणा खाणीतील कोळशाची जड वाहतूक होत होती. ४० टनाची वाहने धावण्याची क्षमता नसलेल्या मार्गाने जड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. तसेच सतत धावणाऱ्या जड वाहनांमुळे दळणवळणास अडथळा निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक जिव मुठीत घेऊन ये-जा करीत होते. या मार्गाने होणारी जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले. वरोरा या तालुक्याच्या मुख्यालयी येण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना वेकोलिला देण्यात आल्या. परंतु, दोन वर्षांचा काळ लोटूनही वेकोलि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वरोराचे सहायक अभियंता यांनी वरोरा-माढेळी मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
परंतु, या मार्गाने धावणारी जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांनी स्वता एकोणा खाणीतून होणारी कोळशाची जड वाहतूक रोखून धरली. या प्रकारामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.
 यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नोपानी, माजरी खाणीचे एजीएम गुप्ता, प्रमोद मगरे, नीलेश भालेराव, प्रवीण काकडे, शैलेश पद्मगिरीवार, राहुल ठेंगणे, मिलिंद भोयर, किशोर मगरे उपस्थित होते.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी दूध, भाजिपाला, अन्नधान्य, शेतीविषयक साहित्य व इतर जिवनावश्यक वस्तू, खडी, वाळू, गिट्टीची वाहतूक वगळता माढेळी नाकामार्गे, वरोरा शहरातील राजीव गांधी चौक मार्गे, खेमराज कुरेाकर यांच्या घराजवळून माढेळी मार्गे तसेच माढेळी गावाजवळील टी-पाईंटजवळून होणारी कोळशाची जड वाहतूक बंद करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच वरोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वरोरा ते माढेळी मार्गावर चेक पोस्ट तयार करावे. पोलिस निरीक्षक वरोरा यांनी त्या ठिकाणी फिक्स पाईंट करून पोलिस बंदोबस्त ठेवावा व जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीररित्या कार्यवाही करण्याची जबाबदारी नगरपालिका मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक वरोरा यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे. मागील अनेक वर्षांपासूनचा जड वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाल्याने वरोरा व माढेळी परिसरातील नागरिकांना खासदार बाळू धानोरकर यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने