Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

35 प्रवाशांसाठी पोलीस बनले "देवदूत"


पुरात अडकली खाजगी प्रवासी बस
चंद्रपूर:- मागील तीन दिवसांपासून राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पुर आला असून कित्येक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुचना दिल्या असुन अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. धोकादायक नदी नाल्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अशातच राजुरा तालुक्यातून मोठी बातमी प्राप्त झाली असुन तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खाजगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल 35 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार नुसार मध्य प्रदेशातून हैद्राबाद येथे जाणारी एक खाजगी बस जवळचा मार्ग म्हणुन राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे जात होती. दरम्यान रस्त्यातील नाल्याला जास्त पाणी असल्याने त्या मार्गाने बस नेऊ नये अशी सूचना पोलिसांनी बस चालकला दिली होती.
मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चालकाने त्याच मार्गाने बस पुढे नेली. दरम्यान चिंचोली जवळील नाल्याला पूर आला होता व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती बस पुरात ओढल्या गेली व भर पुरात बस बंद पडली. ह्यामुळे बस मधील प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
 
पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुरात खाजगी प्रवासी बस अडकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी विरूर स्टेशन पोलिसांशी संपर्क साधला व माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच विरुर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने बस मधिल 35 प्रवाशांची सुरक्षित सुटका केली असुन ह्यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समयसूचकता दाखवुन तत्परतेने प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या विरुर पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत