पावसात दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात #accident

Bhairav Diwase
अपघातात एक ठार, एक गंभीर
भद्रावती:- रिपरिप पावसात दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावती शहरापासून ६ कि.मि. अंतरावर निंबाळा फाट्यावर घडली.
अजिंक्य पंढरी खिरटकर (२८) रा. ओंकार ले-आऊट भद्रावती असे मृतकाचे नाव आहे. तर आशिष दिवाकर गौरकार (२६) रा. नवीन मच्छी मार्केट, भद्रावती असे गंभीर जखमीचे नाव आहे. दोघेही काही कामाकरिता दुचाकीने चंद्रपूरला गेले होते. दरम्यान, काम आटोपून परत येताना निंबाळा फाट्यावर त्यांची दुचाकी स्लिप होऊन खाली पडली. त्यात अजिंक्यच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. तर आशिष हा गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
अजिंक्य हा आय. टी. आय. झाला होता. त्याने घराजवळच हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स चे दुकान थाटले होते. तसेच तो स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात बी.ए.द्वितीय वर्षाला शिकत होता. तर आशिष हा चंद्रपूर येथे विद्युत वितरण कंपनीत आपरेटर म्हणून नोकरीला आहे.
अजिंक्यच्या पार्थिवावर पिंडोणी स्मशानभूमीत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट व शहरातील नागरिक उपस्थित होते.