(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- शेतात चरत असलेला बैल अंगावर विद्युत प्रवाह असलेला तार पडून ठार झाल्याची घटना दि.२४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील मांगली (रै.) येथे घडली. मांगली येथील शेतकरी विकास बबन क्षीरसागर यांच्या मालकीचा बैल त्यांच्या शेतात चरत होता. चरता-चरता तो बैल धुरा ओलांडून शेजारच्या शेतात चरायला गेला.
याचवेळी शेतातून गेलेल्या विद्युत तारलाईनच्या खाली असलेला अर्थिंग तार बैलाच्या अंगावर पडला. या अर्थिंग तारात विद्युत प्रवाह असल्याने बैल फडफडू लागला व जागीच ठार झाला.
या घटनेचा विद्युत वितरण कंपनी आणि पोलिसांनी पंचनामा केला आहे. बैलाच्या मृत्युमुळे विकास क्षीरसागर यांचे ४० ते ४५ हजारांचे नुकसान झाले असून आता शेती कशी करावी असा प्रश्न त्यांना पडला आहे. इकडून-तिकडून पैसे आणून बियाणांची लागवड केली. शेतीची मशागत केली.
सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांचे डवरण आणि निंदन करता आले नाही. त्यामुळे ती पिके हातची गेली. त्यामुळे महावितरण आणि शासनाने आपणास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विकास क्षीरसागर यांनी केली आहे.