Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भद्रावती तालुक्यात पूर ओसरु लागला; काही गावे मात्र अडचणीतच! #Chandrapur #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तीन दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने भद्रावती तालुक्यात हाहाकार माजवून जनतेला रडकुंडीस आणले होते, मात्र आता हा महापूर हळूहळू माघार घेत असल्याने तालुक्यातील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अप्पर वर्धा धरणाचे १९ दरवाजे उघडल्याने भद्रावती तालुक्यात पळसगांव, माजरी, कोची, पिपरी, चारगांव, कोंढा, चालबर्डी या गावात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला होता. चारगाव येथील ७०-७५ घरात पाणी शिरल्याने या घरातील कुटुंबांना शेजारच्या एकता नगर वेकोलि वसाहतीत हलवून तेथील सभागृहात राहण्याची व्यवस्था वेकोलि प्रशासनाने केली. बुधवारी पूर ओसरल्याने दुपारी हे सर्व कुटुंब आपल्या गावाच्या दिशेने निघाले. कोची गावातील परिस्थिती मंगळवारी बिघडली होती. रात्री गावात पाण्याची पातळी वाढताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु दुसऱ्या दिवशी पूर ओसरु लागताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर माजरी येथील एकता नगर, शांती काॅलनी, माजरी काॅलरी नवीन वस्ती, जुनी वस्ती इत्यादी भागात पुराचे पाणी शिरले. पोलिस ठाण्यात १ फूट, तर रुग्णालयात ३ ते ४ फूट पाणी साचले होते. पाटाळा पुलावर २५ ते ३० फूट पाणी वाहत होते. त्यामुळे माजरी-वणी मार्ग बंद झाला होता. दरम्यान, पाटाळा येथील पुरात अडकलेल्या जवळपास २५० नागरिकांना मंगळवारी रात्री एनडीआरएफच्या पथकाने पुरातून बाहेर काढले. नंतर त्यांची निवासाची व्यवस्था कुसना येथील वेकोलिच्या सभागृहात करण्यात आली.
दरम्यान, कोंढा येथील पूर अतिशय धिम्या गतीने ओसरत असून हे गांव चोहोबाजूंनी पुराने वेढलेले असल्याने अजुनही बिकट परिस्थितीत आहे. २० ते २५ घरे अजुनही बुडालेली आहेत. नवीन वस्तीत अडकलेल्या लोकांना एनडीआरएफचे पथक बोलावून जुन्या वस्तीत आणण्यात आले. कोंढा येथील जि.प.शाळेच्या इमारतीच्या छताला पाणी टेकले आहे. १९९४ च्या पुरापेक्षाही हा पूर भयानक असल्याचे बोलल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत