दादागिरी चालणार नाही, तुझ्या घरचे पैसे आहेत का? आ. मुनगंटीवारांनी मदत नाकारलेल्या अधिकाऱ्याला झापलं #chandrapur #warora #bhadrawati


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील महापुराची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. अनेक गावांना पूराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पोचलेल्या भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
अधिकाऱ्यांनी मदत न पोहोचवल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा रुद्रावतार यावेळी पाहायला मिळाला. पूराची सर्वाधिक झळ पोचलेल्या पळसगाव येथे मदत नाकारणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्याची सुधीर मुनगंटीवार यांनी कानउघाडणी केली.
गावकऱ्यांना सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलिचा हॉल देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. त्यानंतर संतापलेल्या मुनगंटीवारांनी काही तासात मदत पोचवा अन्यथा हिशोब करतो असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे. पळसगावच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला पुराचा फटका बसला आहे. मात्र सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती हलगर्जीपणा दाखवल्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतले.
"पळसगाव येथे पाणी शिरल्यामुळे लोकांना गावाबाहेर काढावं लागलं आहे. ते सगळे तुमच्या नावाने इतक्या शिव्या देत आहेत की, तुम्ही मोठ्या प्रमाणावर वाळूचे ढिगारे तयार केले, तुमच्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली. गावातल्या लोकांनी पुराचे पाणी आल्याने तुमचे सभागृह देण्याची मागणी केली होती. तेव्हा तुम्ही देणार नाही असे सांगितले. सभागृह तुमच्या घरचे आहे का? तुमच्या पथकाने येथे येऊन लोकांची व्यवस्था करण्याची तुमची नैतिक जबाबदारी आहे," असे मुनगंटीवार म्हणाले
"यासाठी तुमच्या घरचे पैसे द्यायचे नाहीत. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. मदत करायची असल्याने आता मी काही बोलणार नाही. पण सर्व मदतीचे साहित्य पोहोचले पाहिजे हे लक्षात ठेवा. तुमच्या बापाचा माल आहे का, ५० ठिकाणी वस्तू पोहोचवा. लोक तुमच्यामुळे पाण्यात बुडत आहेत आणि तुम्ही कंजुसपणा करत आहात. तुम्ही मदत केली नाही तर मी करेन आणि तुम्हाला नंतर हिशोब दाखवून देईन," असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत