चंद्रपूर:- आठवडा भरापासून चंद्रपूरात सुरु असलेल्या पावसामुळे चंद्रपूरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ पंचणामे करुन नुकसाणग्रस्तांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून संतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शहरातील अनेक घरांची पडझड होऊन नागरिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाल्याने कित्येक कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. सोबतच नदी आणि नाल्यांच्या काठावरील घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शासकीय निकषामध्ये विशेष बाब अंतर्गत शिथिलता देऊन महसूल व वेकोलि च्या जागेवर बांधलेल्या घरांनाही आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. तसेच चंद्रपूर शहरातील पूर परिस्थितीवर सहानभूतीपूर्वक विचार करून सर्व नुकसानग्रस्त कुटुंबियांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणही या निवेदनात आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे