सरदार पटेल महाविद्यालयात व्यायाम शाळेचे उद्घाटन समारंभ संपन्न #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- मनुष्याचे शरीर व मनाला शुध्द करण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायामाचे सर्वांत जास्त महत्त्व विद्यार्थी वर्गासाठी आहे. नियमीत व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवायला हवे. यासाठी आज दि. १८ जुलैला सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे नुतनीकरण करण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन समारंभ थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाषणात डॉ. कित्तीवर्धन दिक्षीत म्हणाले की, कोणताही आजार निर्माण झाल्यावर, त्यावर उपचार करीत बसण्यापेक्षा मुळात आजारच होऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे सर्वात चांगले असते. यासाठी निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे उपयुक्त असते. कारण रोजच्या व्यायामामुळे वजन आटोक्यात राहते, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, रक्तदाब, ब्लड शुगर आणि रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच मानसिक ताण दूर होण्यास व्यायामाने मदत होते. पर्यायाने लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, डायबेटीस, सांधेदुखी, गुडघेदुखी, मानसिक तणाव यासारख्या अनेक गंभीर आजारांपासून नियमित व्यायाम केल्याने दूर राहता येते. अशाप्रकारे निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे खूप महत्त्व आहे.
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी अध्यक्षीय आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात सर्वच वयोगटातील लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत. अभ्यासाच्या ताणातून मुले मैदानी खेळ व व्यायामापासून दुरावली आहेत. तर तरुण वयातील व्यक्तींना करिअर आणि कामाच्या व्यापातून रोजच्या व्यायामाला वेळ देता येत नाही. पैसा व सुख वस्तूंच्या हव्यासापोटी व्यायामाकडे दुर्लक्ष करून आपण आपले बहुमूल्य असे "आरोग्य" धोक्यात घालत आहोत. त्यामुळे वेळीच सावध होऊन प्रत्येकाने आपापल्या कामातून दररोज थोडा वेळ काढून निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. कित्तीवर्धन दिक्षीत माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा सहसचिव सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. कुलदीप गोंड, प्रशिक्षक अमित बेले तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)