चंद्रपूर:- कौटुंबिक कलहातून पती सुधाकर डाहुले याने पत्नी स्नेहा डाहुले हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा देवाडा येथील महाकाली नगरीमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाडा येथील महाकाली नगरीत वास्तव्याला असलेले डाहुले पती-पत्नी सुखाने संसार करीत होते. मात्र, दोघांच्या संसाराला दृष्ट लागली आणि दोघांमध्ये दररोज भांडणे होण्यास सुरुवात झाली. कौटुंबिक कलह वाढत असतानाच पती सुधाकर याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती सुधाकर याने गजानन महाराज मंदिर येथील मैदानातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. सुधाकर डाहुले यांचा मृतदेह अजून मिळाला नाही. आपत्ती व्यवस्थापन यांची चमू सुधाकर यांचा मृतदेह काढण्याचा प्रयत्न करीत आहे. सुधाकर डाहुले हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. पती-पत्नीमध्ये नेमका वाद काय झाला, याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही. तपास सुरू आहे. सोमवारी घडली.