Top News

तेंदूपत्‍ता रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देणार #chandrapur


वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत घोषणा
चंद्रपूर:- तेंदूपत्‍त्‍यापासून वनविभागाला रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणा-या राशीमधून प्रशासकीय खर्च वजा करता उर्वरित रक्‍कम प्रोत्‍साहनार्थ मजूरी अर्थात बोनस म्‍हणून तेंदूपत्‍ता मजूरांना दिली जाते. मात्र २०२२ पासून रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळणारी रक्‍कम ही पूर्णपणे बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍याचा निर्णय वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत जाहीर केला.
दिनांक २४ ऑगस्‍ट २०२२ रोजी विधान परिषदेत वि.प.स. डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्‍या लक्षवेधी सुचनेला उत्‍तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. २०२० मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात मिळालेली रक्‍कम ही प्रशासकीय खर्चापेक्षा कमी असल्‍यामुळे बोनस दिला गेला नाही. २०२१ मध्‍ये १९.८७ कोटी रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना देण्‍यात आली.
२०२२ मध्‍ये रॉयल्‍टीच्‍या स्‍वरूपात ७२ कोटी इतकी रक्‍कम जमा झाली आहे. मात्र यापुढे या रकमेतुन प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्‍कम मजूरांना बोनसच्‍या स्‍वरूपात देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. आता जवळपास चौपट रक्‍कम बोनसच्‍या स्‍वरूपात मजूरांना मिळणार आहे.
स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमीत्‍ताने वनक्षेत्रात राहणा-या तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणा-या तेंदूपत्‍ता मजूरांना आर्थिकदृष्‍टया स्‍वयंपूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने हा निर्णय घेण्‍यात येत असल्‍याचे वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. २०२१ चा तेंदूपत्‍ता बोनस येत्‍या दोन महिन्‍यात मजूरांना मिळेल अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने