मुलीच्या लग्नासाठी घेतलेले दागिने लंपास


वेकोलि अधिकाऱ्याच्या घरी धाडसी चोरी
चंद्रपूर:- घरी सर्वजण झोपले असतानाही चोरट्यांनी खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. आलमारीचे कुलूप फोडून सोन्याचा हार, चांदीचे ५० शिक्के व रोकड असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील वेकोलि वसाहतीमध्ये सोमवारी घडली. वेकोलि अधिकारी आर. के. प्रसाद यांनी ते दागिने मुलीच्या लग्नासाठी खरेदी केले होते.
वेकोलिचे अधिकारी आर. के. प्रसाद हे नांदगाव पोडे येथील वेकोलि वसाहतीमध्ये वास्तव्यास आहेत. त्याच्या मुलीचे लग्न जुळले आहे. त्यामुळे लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी त्यांनी ५० चांदीचे शिक्के तयार केले होते. सोमवारी रात्री ते झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर आलमारीचे लॉक फोडून आलमारीतील सोन्याचा हार, चांदीचे ५० शिक्के व रोकड असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अशी तक्रार आर. के. प्रसाद यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये केली.
दरम्यान, ठाणेदार सुधाकर अभोरे, सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्यासह डीबी पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा करून अज्ञात आरोपीवर कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत