येत्या सोमवार पर्यंत गोंडपिपरी-धाबा-पोडसा बस सेवा सुरू करा #chandrapur #gondpipari

अन्यथा बुधवारला रास्तारोको आंदोलन करण्याचा देविदास सातपुते यांचा इशारा
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील गोंडपिपरी-धाबा-पोडसा या परिसरात कित्येक महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन सुद्धा बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही.येत्या सोमवार पर्यंत बस सेवा सुरू न केल्यास दि.२८ सप्टेंबर बुधवारला रोडलाईन परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पदाधिकारी,नागरिक व शालेय विद्यार्थ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा पोडसाचे सरपंच तथा गोंडपिपरी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष देविदास सातपुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेला आहे.
गोंडपिपरी, धाबा, पोडसा बस सेवा सुरू नसल्याने ज्यादा पैसे मोजून कित्येक विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांनी वेळे अवेळी प्रवास करावा लागत आहे.सदरचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागत आहे. सोबतच सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा बस सेवेअभावी तहसील स्तरावर महत्त्वाच्या प्रशासकीय कामासाठी प्रवास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या परिसरात बस सेवा सुरू करण्याकरिता क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी अनेकदा एस. टी. महामंडळाच्या वाहतूक विभागास मागण्या करून आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु वाहतूक विभागांनी यावर कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही व बस सेवा सुरू करण्यासंबंधी कुठलेही सहकार्य झालेले नाही. आता मात्र पुरे झाले.!! येत्या सोमवार पर्यंत तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा आणि एस. टी. महामंडळ वाहतूक विभाग प्रशासनांनी गोंडपिपरी धाबा पोडसा मार्गावरील वाहतुकीची विशिष्ट अडचण बघून बस सेवा सुरू करण्याकरिता पाऊस उचलावे. आणि सोमवार पर्यंत बस सेवा सुरू करावी.
#आंदोलन

दिनांक २८ सप्टेंबर २०२२ बुधवारला सकाळी १०:०० वाजेपासून रोडलाईन वरील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोडसा ग्रामपंचायतचे सरपंच तथा गोंडपिपरी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष देवीदास सातपुते यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत