अखेर किती दिवस भोगायची नरक यातना
कोरपना:- गडचांदूर औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातिल मोठे व नावाजलेले शहर गडचांदूर, हे तीन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर आहे. मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय शासकीय नीमशासकीय कार्यालय, बँका असल्याने विविध कामानिमीत्य हजारो नागरिक दररोज याठिकाणी येतात, परंतु या नावाजलेल्या शहर बसस्थानकाविना पोरका.....! असल्याची भावना व्यक्त होत असून अखेर कीती दिवस भोगायची ही नरक यातना असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
या ठिकाणी बसस्थानकाच्या नावाखाली प्रवासी निवारे उभारून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली गेली. नागरिकांना होणार्या त्रासाने परिसीमा गाठली असून सर्व सुविधा युक्त, सुसज्ज असे बसस्थानकाचे सुख केव्हा मिळणार हा मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे.
बसस्थानक अभावी येथे येणार्या जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून तिन्ही ऋतूत बसच्या प्रतीक्षेत बिचाऱ्या निष्पाप लोकांवर इकडे-तिकडे उभे राहण्याची नामुष्की ओढवली आहे.
विषेशता: चिमुकल्या बाळांची माता, वयोवृद्ध स्त्री, पुरुष व लहान-मोठे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जनता इतक्या बिकट परिस्थितीचा सामना करीत असताना मागील लोकप्रतिनिधींनी याविषयी अघोषित चुप्पी साधल्याचे दिसत होते. लोकांची गर्दी पाहता येथे मोठे व सुसज्ज बसस्थानक होणे. अत्यंत गरजेचे आहे मात्र असे होतांना दिसत नाही.
बसस्थानक नसल्यामुळे नाईलाजास्तव लोकांना प्रसाधनगृहा पुढे उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जनतेला सुविधा पुरविण्याची जबाबदारी लोकप्रतिनींधीची असते मात्र या ठिकाणी वेगवेगळे चित्र दिसत आहे. भव्य-दिव्य चित्र दाखवून जनतेच्या तोंडाला पाने पुसणे हाच एकेकलमी कार्यक्रम आज पर्यंत सूरू असून सध्याची परिस्थिती लक्षात घेता "गडचांदूर शहर हे बसस्थानकावीना पोरके" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.