चंद्रपूर:- घुग्घुस नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांना निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. गट-ब संवर्गातील मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर तत्कालीन मुख्याधिकारी, घुग्घुस नगर परिषद जि. चंद्रपूर यांना घुग्घुस अमराई वार्डात दिनांक २६ ऑगस्ट रोजी भुस्खलनाची घटना घडल्यानंतर त्या भागातील १६० कुटुंबियांना धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री यांच्या हस्ते देण्यासंदर्भातील दिनांक ८ सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमाची कार्यरत मुख्याधिकारी म्हणून पूर्वकल्पना होती.
सदर कुटुंबियांच्या नावाचे १६० धनादेश देखील त्यांच्या अधिनस्त नगर परिषदेच्या ताब्यात होते. केवळ त्यांच्या बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा मुळे धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री महोदयांना व १६० कुटुंबियांना ३ तासाहून अधीक काळ वाट पाहावी लागणे हि बाब मुख्याधिकारी या पदावरील अधिकाऱ्यास अत्यंत अशोभनीय व गंभीर असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९८१ च्या तरतूदीचा भंग करणारी आहे.
भुस्खलनसारख्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचे धनादेश तातडीने वाटप होण्याच्या कामी त्यांची असंवेदनशीलता देखील दिसून येते. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्याकडे भद्रावती नप या पदाचा नियमित कार्यभार त्यांच्याकडे दिनांक ८ जुलै २०२० पासून आहे. तसेच मुख्याधिकारी घुग्घुस नगर परिषद या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्याकडे होता.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक १२ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये मुख्याधिकारी घुग्घुस नगर परिषद या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी भद्रावती नगर परिषद जि. चंद्रपूर या पदावरून निलंबित करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.
सूर्यकांत पिदूरकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ पोटकलम (१) (अ) च्या तरतुदीनुसार तत्काळ निलंबित करण्यात येत असून, ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील.