Top News

सेफ्टीक टँकरची बैलबंडीला धडक; मुलगा ठार, वडील जखमी

गडचिरोली:- शेतातील काम आटाेपून घराकडे परत येत असताना, शौचालय साफ करणाऱ्या सेफ्टीक टँकरने बैलबंडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण शेतकरी मुलगा ठार, तर वडील जखमी झाले.
ही घटना मंगळवारला सायंकाळच्या सुमारास काेंढाळा येथे घडली. राेषण माणिक वाढई (२० वर्ष) असे मृत तरुणाचे, तर माणिक वाढई (५४) असे जखमी वडिलाचे नाव आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी हा टँकर पेटवून दिला.
एबी २३ व्ही ६६४७ क्रमांकाचा शौचालय साफ करणारा टँकर देसाईगंजवरून आरमाेरीकडे जात हाेता. याचमार्गे शेतकरी बापलेक गावाकडे बैलबंडीने येत हाेते. बैलबंडीच्या मागे म्हैस बांधली हाेती. दरम्यान, त्या टँकरची बैलबंडीला धडक बसली. यात बैलांना दुखापत झाली. राेषण वाढई हा गंभीर जखमी झाला, तर त्याचे वडील माणिक वाढई किरकाेळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच, गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळावर गर्दी केली. संतप्त जमावाने अपघातग्रस्त टँकरला आग लावून पेटवून दिले. दरम्यान, देसाईगंज येथून अग्निशमन दलाला बाेलाविण्यात आले. दुसरीकडे गंभीर जखमी राेषण वाढईला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात औषधाेपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान रात्री ९ वाजताच्या सुमारास राेषणचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी पेटविला टँकर

अपघात हाेताच सेफ्टीक टँकरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला, पण संतप्त नागरिकांनी टँकर पेटवून दिला. देसाईगंज पाेलिसांनी घटनास्थळ गाठून संतप्त जमावाला शांत केले आणि ट्रक विझविण्यासाठी सहकार्य केले. या घटनेमुळे काेंढाळा गावातील नागरिकांनी ट्रक चालक व मालकाच्या विराेधात राेष व्यक्त केला. या घटनेबाबत देसाईगंजच्या पाेलीस ठाण्यात ट्रक चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने