Top News

देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय राज्यात स्थापन होणार #chandrapur #Mumbai #Maharashtra


कॅबिनेट बैठकीत निर्णय; बच्चू कडूंना अत्यानंद

मुंबई:- रुग्णसेवा आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून आमदार बच्चू कडू यांची राज्यभर ओळख आहे. मात्र, शिंदे गटासोबत गेल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावरुनही कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी प्रयत्न करणारा आहे, असे म्हणत मंत्रीपदापेक्षा मला लोकांसाठी होणारी काम महत्त्वाची असल्याचंही कडू यांनी म्हटलं होतं. आता, आमदार बच्चू कडू यांची आजपर्यंतची सर्वात मोठी मागणी मान्य झाली आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कडू यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नाला मोठं यश आलं आहे.
दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले जात नाही यामुळे त्यांच्या समस्या वर्षानु वर्षे प्रलंबित राहतात. त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. दिव्यांग घटकातील कुणीही दुर्लक्षित राहू नये. त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी स्वतंत्र मंडळ सुरु करणे गरजेचे असल्याचे कडू यांनी मागणीपत्रात म्हटले होते. त्यानुसार, आता कडू यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय आज झाला. 25 ते 30 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आज झाला. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झाला, असे बच्चू कडू यांनी म्हटले. विशेष, म्हणजे बच्चू कडू यांच्यासाठी खास कॅबिनेट खातं तयार केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली होती.
शिंदे गटात गेलेले बच्चू कडू यांच्यासाठी देशातील पाहिलं दिव्यांग मंत्रालय उभं केलं जाणार आहे. पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असून दिव्यांग यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभं केलं जाणार आहे. 3 डिसेंबरला याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली. तसेच, आज या गोष्टीचा सर्वाधिक आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने