नक्षल्यांनी केली सहकाऱ्याची हत्या #chandrapur #gadchiroli #murder

एटापल्ली:- पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री (दि. ७) आपल्या एका सहकाऱ्याची गोळी घालून हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा गावानजीक घडली. दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी (वय २६) असे मृत नक्षलवाद्याचे नाव आहे, मृत व्यक्ती एटापल्ली तालुक्यातील झुरी या गावचा रहिवासी होता.
याबाबतच्या अधिक माहितीनुसार, सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी दिलीप हिचामी यास गर्देवाडा गावाजवळच्या रस्त्यावर गोळी झाडून ठार केले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ठेवली असून, त्यामध्ये दिलीप हिचामी हा पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याची हत्या केल्याचे म्हटले आहे.
२०११ मध्ये दिलीप हिचामी नक्षल दलममध्ये सहभागी झाला. २०१२ मध्ये तो कसनसूर एलओएसचा पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहत होता. सप्टेंबर २०२२ पर्यंत तो दलममध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिलीपने पोलिसांशी संपर्क ठेवत शंकरराव नामक नक्षलवाद्याची विभागीय समिती सदस्याची हत्या केली. ही हत्या चकमकीत झाल्याचा देखावा दिलीपने केला होता. तो पोलिसांचा खबऱ्या असल्याचे समजल्यानंतर त्याची हत्या करीत असल्याचे नक्षलवाद्यांनी मृतदेहावर टाकलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत