Top News

वाघ जागचा हलेना, पतीही माघारी वळेना! #Chandrapur #nagbhid #Tiger #tigerattack


वाघ आला अंगावर, त्याने तिला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले
नागभीड:- कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. त्याने तिला खरोखरच साक्षात मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणले. त्याच्या या हिमतीची आणि ढोरपा शिवारात घडलेल्या या थराराची परिसरात चांगलीच प्रसंशा होत आहे.
सोमेश्वर भुरले असे या जिगरबाज व्यक्तीचे नाव असून तो तालुक्यातील ढोरपा येथील रहिवासी आहे. सोमेश्वर पत्नी सवितासह स्वतःच्या शेतावर गेला होता. पत्नी धान कापणीनंतर शेतात पडलेल्या धानाच्या ओंब्या वेचत होती. तर सोमेश्वर बाजूच्याच बांधात गवत कापत होता. सविता ओंब्या वेचण्याच्या कामात व्यस्त असताना वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्याने ती भांबावली. मात्र प्रसंगावधान राखून तिने वाचवा वाचवा असा आरडाओरडा केला. या आवाजाने बाजूलाच गवत कापत असलेला तिचा पती आवाजाच्या दिशेने धावला.
मात्र त्याच्या पत्नीला वाघाच्या रूपाने आलेला साक्षात काळच फरफटत ओढून नेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. पण स्वतःचा तोल ढळू देता आणि खंबीर मनाने तो त्या प्रसंगाला सामोरा गेला. पत्नीला फरफटत नेत असलेल्या वाघाच्या दिशेने तो धावला आणि स्वतःजवळ असलेली कुऱ्हाड वाघाच्या दिशेने फेकून मारण्याचे नाटक करीत दबक्या पावलांनी वाघाजवळ गेला.
वाघ जागचा हलेना, पतीही माघारी वळेना!

सोमेश्वरच्या हातात कुऱ्हाड घेऊन वाघाच्या दिशने धावून गेला. या पवित्र्याने सविताला जबड्यात घेतलेला वाघही गांगरून गेला. पण सविताला जबड्यात घेतलेला वाघही जागचा हलत नव्हता आणि सविताचा पती सोमेश्वरही माघारी वळायला तयार नव्हता.
हळूहळू सोमेश्वर वाघाजवळ पोहोचला आणि वाघावर कुऱ्हाड उगारून त्याने सवितास वाघाच्या जबड्यातून बाहेर काढून वाघाकडे पाहत माघारी पावलाने सवितास काही अंतर ओढत नेले. यानंतर वाघ काही अंतरावर दूर गेला. नंतर क्षणाचाही विलंब न लावता त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांची मदत घेत पत्नी सविताला दवाखान्यात नेले. सवितावर आता ब्रम्हपुरी येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत."

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने