वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी #chandrapur #Saoli

सावली:- स्वतःची जनावरे चराईसाठी जंगलात नेली असताना वाघाने हल्ला करून गुराख्याला जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपरी जंगल परिसरात घडली.
खुशाल कवडू शेट्ये (वय ५०) असे जखमी गुराख्याचे नाव आहे. खुशाल हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आपली जनावरे उपरी जंगल परिसरात चराईसाठी गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी परिसरातील लोकांनी आरडाओरड केली. तसेच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यामुळे वाघ जंगलात पळाला.
जखमी अवस्थेत गुराख्यास नागरिकांनी गडचिरोली शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती सावली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूकर यांना मिळता त्यांनी आपला चमू पाठवून पंचनामा केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत