(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- ५५ वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सोमवारी (दि. १४) पोलिसांकडून दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. खून झालेल्या वृद्ध आणि आरोपींमध्ये वाद झाल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे. वरोरा तालुक्यातील चारगाव-वायगाव मार्गावरील एका झुडपात शुक्रवारी (११ नोव्हेंबर) सकाळी मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सौरभ प्रकाश हिवरे (वय २२ रा. चारगाव) अतुल मधूकर मडकाम (रा. जांब, समुद्रपुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार, भेंडाळा येथील सदाशिव महाकुळकर हे वायगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे न्यायालयीन काम असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी पोहचला नाही. शुक्रवारी (दि.११) सकाळच्या सुमारास चारगाव वायगाव मार्गावरील एका झुडूपात त्याचा मृतदेह आढळून आला होता.
शेगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पंचनामा केला. मृतदेहावरून त्या वृध्दाचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता. ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी या घटनेचा तपास तातडीने सुरू केला. काही तांत्रिक तपासाद्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यावरून दोन तरुणांचा खूनात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन सोमवारी सौरभ हिवरे, अतुल मडकाम या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
१० नोव्हेंबरच्या रात्री सदाशिव महाकुळकर हे बाहेर गावी जाण्यासाठी बसस्टॉप येथे आले होते. आरोपी सौरभ हिवरे याचे चारगाव वायगाव मार्गावर पानटपरी आहे. त्याच ठिकाणी असलेल्या बसस्टॉपमध्ये तो झोपतो. रात्री महाकुळकर बसस्टॉप वर आले असता आरोपी सौरभने दारू पिऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. शेवटी वाद विकोपाला गेल्याने सौरभने मित्र अतुल मडकाम याला बोलावले आणि दोघांनी मिळून त्या वृध्दाचा दगडाने ठेचून खून केला.