बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित #suspended

Bhairav Diwase
खासदार बाळू धानोरकर यांच्या मागणीची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल


चंद्रपूर:- बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव याना निलंबित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर ओवर ब्रीज तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. नीलिमा रंगारी असे या शिक्षिका असलेल्या मृत महिलेचे नाव असून, त्याच्या कुटंबीयांना आर्थिक साहाह्यासोबतच कुटुंबातील एकाला रेल्वेमध्ये नोकरी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र सौंदर्यकरणासोबत मजबुतीकरण झालेली नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओवर ब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणात दोन अधिकारी दोषी दिसून आल्याने त्यांच्यावर रेल्वे विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहे.