कुटुंबापासून वेगळे राहण्यासाठी मुलाने वडिलांना संपविले #chandrapur #gadchiroli #Desaiganj #murder

Bhairav Diwase

हत्या करून रेल्वे अपघाताचा केला बनाव


देसाईगंज:- देसाईगंज शहरातील तुकूम वार्ड परिसरात ५ डिसेंबर रोजी एका ५३ वर्षीय इसमाचा खून करून वडसा-गोंदिया रेल्वे लाइनलगत एका शेताच्या बांधावर मृतदेह ठेवण्यात आला होता. सुरुवातीला त्या इसमाचा मृत्यू रेल्वे अपघात झाला की त्याचा खून झाला याबाबत संभ्रमाची स्थिती होती. परंतु एक तरुण रक्ताने माखलेल्या कपड्यात काही नागरिकांच्या निदर्शनास आला असल्याच्या खात्रीशीर माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. तो दुसरा-तिसरा कोणी नसून मृत व्यक्तीचा मुलगाच असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.

मृतक अरुण संपत कोवे (५३ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह शहरातील शिवाजी वार्ड येथे राहत होते. त्यांचा मुलगा करण (२८) हा विवाहित असून, तो अनेक दिवसांपासून पत्नीला घेऊन वेगळा राहण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त करत होता. परंतु वडिलाने त्याची इच्छा नाकारली होती. त्याच रागातून त्याने वडिलांना कायमचे संपविले.

सोमवारी अरुण कोवे रोजच्याप्रमाणे शेळ्या चारण्याकरिता गेले असताना दुपारी १:३० ते २ वाजताच्या सुमारास मुलगा करण याने धारदार शस्राने वडिलाची हत्या केली. ही हत्या नसून अपघात आहे, असा बनाव करण्यासाठी मृतदेह वडसा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीजवळच्या बाभळीच्या झाडाखाली धुऱ्यावर फेकून दिला. परंतु त्याच्या अंगावरील रक्ताचे डाग काही लोकांच्या निदर्शनास आल्याने ही बाब प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली.

पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मुलाला अटक केल्यानंतर चौकशी केली असता मुलगाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून मंगळवारी देसाईगंज न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.