शेतातील धानाच्या पुंजण्याला आग #chandrapur #pombhurna #fire #firenews

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- तालुक्यातील जामतुकूम येथील शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागून ४ एकर शेतातील धान जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. यात अंदाजे दिड लाख रूपयाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. गंगाधर भलवे (४२) नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गंगाधर भलवे यांचे जामतूकम येथे चार एकर शेती आहे. मेहनत करून त्यांनी धानाचे भरीव पिक घेतले होते. शेतशिवारात असलेल्या धानाच्या पुंजण्याला शनिवारला पहाटेच्या सुमारास चार वाजता अचानक आग लागली. काही वेळातच पुर्ण पुंजणा जळून खाक झाला.

सदर घटनेमुळे शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोंभूर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा प्राथमिक अहवाल देवाडा खुर्दचे तलाठी किशोर भोयर यांनी वरिष्ठांकडे पाठविला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.