Click Here...👇👇👇

जिल्हा स्टेडियमवर अंधारात करावा लागतो विद्यार्थ्यांना स्केटिंगचा सराव #chandrapur

Bhairav Diwase

पालकांमध्ये संताप; क्रीडा अधिकाऱ्यांचे झाले दुर्लक्ष?


चंद्रपूर:- चंद्रपूर येथील जिल्हा स्टेडियमवर असलेल्या स्केटिंग ग्राऊंडवर मोठ्या संख्येने विद्यार्थी सराव करण्यासाठी येतात. मात्र, ग्राऊंडची दुरवस्था तसेच अंधार असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी थेट पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत येथील दुरवस्था कथन केली आहे. येथील जिल्हा स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने खेळाडू सराव करण्यासाठी येतात. पहाटेपासून येथे सारखी गर्दी असते.

🏥
दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये या गाऊंडची दुरुस्तीही करण्यात आली आहे. मात्र, येथे असलेल्या स्केटिंग गाऊंडवर अंधाराचे साम्राज्य आहे. विशेषत: या परिसरात झाडे, झुडपेही वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राऊंडची दुरवस्था असतानाही कोणताही दुसरा पर्याय नसल्याने खेळाडू याच दुरवस्था झालेल्या ग्राऊंडवर सराव करीत आहेत. यासंदर्भात पालकांनी अनेकवेळा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यासंदर्भात पालकांनी आता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.

🏥

स्केटिंग स्पर्धाही नाही

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शालेय स्केटिंग स्पर्धा पार पडली आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अजूनही यासंदर्भात काहीच हालचाली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेसंदर्भात तारीख जाहीर करून ती पुन्हा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.