तरुणांनी लिहिलेल्या साहित्यातून समाज शक्तिमान होईल:- आ. विजय वडेट्टीवार #chandrapurचंद्रपूर:- चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना साहित्यातले गुरू म्हणतात. ग्रामगीतेत गावाचे गावपण कसे असावे याबाबत त्यांनी विस्तृत सांगितले आहे. आता साहित्य वयस्क होत चाललेले आहे, त्याला तरुण करण्याची गरज आहे. तरुणांनी लिहिलेल्या साहित्यातून समाज शक्तिमान होईल. साहित्याने समाज परिवर्तन होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, संमेलनाचे संरक्षक तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, प्र.-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर, संमेलनाचे कार्यवाह इरफान शेख, प्रकाश देवतळे, डॉ. श्याम मोहरकर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

इतिहास कोणत्याही एका बाजूने बघू नका तर दोन्ही बाजूंनी बघा असे सांगत साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावला असल्याचे मत संमेलनाध्यक्ष वि. स. जोग यांनी येथे बोलताना व्यक्त केले. चंद्रपूरच्या प्रयोजनात सदर साहित्य संमेलन यशस्वी झाले असल्याचे कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले. यावेळी ठरावाचे वाचन संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी केले. याप्रसंगी अनेक राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झालेल्या 'पल्याड' या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक शैलेश दुपारे याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रवींद्र शोभणे, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सत्कार मूर्ती शेलेश दुपारे यांची भाषणे झाली. संचालन गीता रायपूरे यांनी, तर आभारप्रदर्शन इरफान शेख याने केले. यावेळी साहित्यप्रेमी, प्राध्यापक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत