जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव अत्याधुनिक व्हावा #chandrapur

Bhairav Diwase
0

माजी उपमहापौर पावडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


चंद्रपूर:- जिल्हा क्रीडासंकुल चंद्रपूर येथील जलतरण तलावाचे अत्याधुनिकीकरण करण्यात यावे अशी मागणी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडे मंगळवार 13 डिसेंबरला दिलेल्या निवेदनातून केली आहे. क्रीडाप्रेमींच्या आग्रहास्तव ही मागणी करण्यात येत असून ती पूर्ण झाल्यास याचा लाभ चंद्रपुरातीलच नाही तर अन्य जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना होईल असा आशावाद राहुल पावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केला आहे.

सविस्तर असे की, मागील काही वर्षांपासून जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचा वापर वाढला आहे. यात महिला, युवा, युवती व बालगोपालांचाही सहभाग आहे. याच तलावात जलतरणचे प्रशिक्षण घेऊन हजारो खेळाडूंनी चंद्रपूरचे नावलौकिक केले.देशात होणाऱ्या विविध जलतरण स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून हा जलतरण तलाव अत्याधुनिक असावा.आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्या.अशी मागणी क्रीडाप्रेमींची होती.त्या अनुषंगाने माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी मंगळवार 13 डिसेंबर 2022ला तलावाची पाहणी करून पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.

यावेळी माजी महापौर अंजली ताई घोटेकर ,माजी नगरसेविका शीलाताई चव्हाण , चंद्रकलाताई सोयाम भाजपा उपाध्यक्ष सुरज पेदुलवार, भाजयुमो महामंत्री सुनील डोंगरे , डॉक्टर येडे भाजयुमो सचिव सत्यम गाणार, भाजयुमो सचिव मनोज पोतराजे महिला आघाडी प्रभाताई गुढदे आदी उपस्थित होते.

 पालकमंत्र्यांनी क्रीडा संकुल चंद्रपूर येथील जलतरण तलावाचे अत्याधुनिकीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून लवकरच निधी उपलब्ध करूनदेण्याचे आश्वासन दिल्याने जलतरण तलावाच्या अत्याधुनिकरणाचा मार्ग सुलभ झाला आहे.समस्या सोडविण्यासाठी माजी उपमहापौर पावडे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील खेळाडूंनीं ना. मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)