नक्षलवादी असल्याचे भासवून ६० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक #chandrapur #gadchiroli #arrested

Bhairav Diwase


गडचिरोली:- नक्षलवादी असल्याचे सांगून एका बांधकाम कंत्राटदाराला ६० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नीतेश मट्टामी (२६) व गणू नरोटे (४२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही चामोर्शी तालुक्यातील माडे आमगाव येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी एकूण ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४ जण फरार आहेत.

धानोरा तालुक्यातील पेंढरी पोलीस मदत केंद्रांतर्गत सावंगा गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ९ जानेवारीला ६ जण बांधकामस्थळी गेले. त्यांनी मजुरांना धमकावून मारहाणही केली. त्यानंतर मजुरांकडील मोबाईल हिसकावून ६० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास वाहनांची जाळपोळ करून कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकीही दिली.

या संपुर्ण प्रकारामुळे भयभीत झालेल्या कंत्राटदाराने गावकऱ्यांना सांगितले. पुढे गावकऱ्यांनी खंडणी मागणारे नेमके नक्षलवादीच आहेत काय, याविषयी शोध घेतला. मात्र, भलतीच माहिती पुढे आली. त्यानंतर गावकऱ्यांनी १२ जानेवारीला आरोपींना खंडणीची रक्कम घेण्यासाठी बोलावले तेव्हा ते नक्षलवादी नसल्याची खात्री पटताच दोघांना पोलिसांच्या ताब्‍यात दिले. याप्रकरणी पेंढरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उर्वरित चार जण फरार आहेत. आरोपींमध्ये तीन जण आत्मसमर्पित नक्षल असल्याची चर्चा आहे.